मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत हिने उर्मिला मातोंडकर हिच्यावर आज तिने मुंबईत तीन कोटी रूपये खर्चून विकत घेतलेल्या ऑफिसवरून टीकास्त्र सोडले, पण तिच्या या आरोपांना उर्मिला मातोंडकर हिनेही तितक्याच तत्परतेने उत्तर देत तिचे आरोप धुडकाऊन लावले आहेत.
उर्मिला मातोंडकर हिने कॉंग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती, पण नंतर तिने शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेच तिने मुंबईत तीन कोटी रूपयांचे एक ऑफिस विकत घेतले आहे. त्या बातमीवरून कंगनाने तिच्यावर निशाणा साधला. शिवसेनेच प्रवेश केल्यानंतर काहीं आठवड्यातच ही नवीन खरेदी तिने केली असल्याचे कंगनाने म्हटले आहे.
मी मुंबईत कष्टाने कमावलेल्या पैशातून जे घर विकत घेतले ते कॉंग्रेसकडून पाडले जात आहे. माझ्या विरोधात 25 ते 30 खटले दाखल करण्यात आले आहेत. मीही तुझ्या सारखीच हुशारी दाखवून कॉंग्रेसशी सलगी कायम ठेवायला पाहिजे होती, पण मी किती मुर्ख आहे ना ? असा सवाल कंगनाने उर्मिला केला आहे.
त्याला प्रत्युत्तर देताना उर्मिलाने ट्विटरवर म्हटले आहे की, मी माझे जे ऑफिस माझ्या कष्टाच्या पैशातून विकत घेतले आहे त्याची सारी कागदपत्रे दाखवण्यासाठी मी तुला तू सांगशिल त्या ठिकाणी त्यावेळी भेटण्यास तयार आहे कधी भेटायला येणार असा प्रश्न उर्मिलाने कंगनाला विचारला आहे.
मी मुंबईत 2011 साली फ्लॅट कसा घेतला आणि 25-30 वर्ष प्रचंड काम करीत कष्टाने पैसे मिळवले, माझ्या कार्यालयासाठी मी कसे पैसे जोडले याचेही पुरावे मी तुला सादर करू इच्छिते असेही उर्मिलाने म्हटले आहे. मी माझा जुना फ्लॅट विकून हे नवीन ऑफिस घेतले आहे आणि राजकारणात प्रवेश करण्यापुर्वी मी हा फ्लॅट विकत घेतला होता असेही उर्मिला मातोंडकर हिने म्हटले आहे.
करदात्यांच्या पैशातून कंगनाला देण्यात आलेल्या वाय कॅटेगरीच्या सुरक्षेवरही उर्मिलाने आक्षेप नोंदवला आहे. चित्रपटसृष्टीतील जे लोक मादकद्रव्यांचा वापर करीत आहेत त्याची यादी आपल्याकडे आहे असा दावा मध्यंतरी कंगनाने केला होता. त्याचीही उर्मिलाने तिला आठवण करून दिली असून ही यादी तू एनसीबीकडे कधी देणार याची मी वाट पहात आहे असेही तिने म्हटले आहे.