कराची – पाकिस्तानचा माजी कसोटी क्रिकेटपटू व मुळचा हिंदू असलेल्या दानिश कनेरिया याने सपत्नी येथे सत्यनारायणाची महापुजा केली. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात पत्नी धर्मितासह सत्यनारायणाची पूजा करताना दिसतोय.
हा व्हिडिओ कनेरियाची पत्नी धर्मिताच्या घरातील असून कराचीतील सत्यनारायण स्वामी मंदिरात ही पूजा आयोजित करण्यात आली होती. व्हिडियोत दानिश पूजा पाठ करताना दिसत आहे. गेल्या वर्षी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसाठी भूमिपूजन केले होते. तेव्हा त्याने अयोध्येत येऊन श्री रामाचे दर्शन घेणार असल्याचे म्हटले होते. पाकिस्तान संघाकडून झालेला अन्याय तसेच विविध वादग्रस्त वक्तव्यांनी कनेरिया सातत्याने चर्चेत राहिला आहे.
सोशल मीडियावरही तो आपली मते परखडपणे व्यक्त करत असतो. यामुळे अनेकदा त्याला धमक्याही आल्या आहेत. गेल्या वर्षी त्याने पाकिस्तान क्रिकेट मंडजिळावर केलेले आरोप प्रचंड गाजले होते. आता सत्यनारायण पुजा केल्यामुळे ते चर्चेत आला आहे. पाकिस्तानकडून 62 कसोटी सामने खेळलेल्या कनेरियाचा जन्म कराचीमध्ये झाला असला तरी भारतातील सुरत शहराशी त्याचे कौटुंबीक संबंध आजही आहेत.