साउदम्पटन – कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडला 249 धावांवर रोखले. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व महंमद शमीने त्यांच्या डावाला खिंडार पाडल्यामुळे न्यूझीलंडला 32 धावांच्या निसटत्या आघाडीवर समाधान मानावे लागले.
चौथा दिवस संततधार पावसाने वाया गेल्यानंतर पाचव्या दिवशीही पावसामुळे अर्धा तास खेळ उशिरा सुरू झाला. न्यूझीलंडने आपला पहिला डाव 2 बाद 101 धावांवरून पुढे सुरू केल्यावर कर्णधार केन विल्यमसनने एक बाजू लावून धरली.
रॉस टेलर, हेन्री निकोलस व बी जे वॉटलिंग यांनी साफ निराशा केली. त्यावेळी ईशांत शर्मा व महंमद शमी यांनी वातावरणाचा सुरेख लाभ घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्यांचा निम्मा संघ 135 धावांत तंबूत परतला होता. विल्यमसनने आधी कॉलिन डी ग्रॅण्डहोमला तर, नंतर कायल जेमिसनला साथीला घेत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विल्यमसन मात्र अर्धशतक करू शकला नाही.
केवळ एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले. तो बाद झाल्यावर टीम साउदीने आक्रमक फटकेबाजी करत संघाला द्विशतकी धावांच्या पुढे मजल मारून दिली. मात्र, पुन्हा एकदा शमीने त्यांना रोखले. रवीचंद्रन अश्विनने नील वॅगनरला बाद करत त्यांचे शेपूट फार वळवळणार नाही याची काळजी घेतली.
रवींद्र जडेजाने साउदीला बाद करत त्यांचा डाव संपवला. न्यूझीलंडने 32 धावांची निसटती आघाडी घेतली. भारताकडून महंमद शमीने सर्वाधिक 4 गडी बाद केले. ईशांत शर्माला 3 बळी मिळवले. रवीचंद्रन अश्विनने 2 तर, रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला.
पाचव्या दिवशीही सुरुवातीला पाऊस पडल्यामुळे मॅच एक तास उशिरा सुरू झाली. या आधी पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही संपूर्ण खेळ झाला नव्हता. या सामन्यासाठी आयसीसीने बुधवारचा दिवस राखीव ठेवला आहे, त्यामुळे उरलेली षटके राखीव दिवशी खेळवली जाणार आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे आता या सामन्याचा निकाल लागणे अशक्य दिसत असून काही चमत्कार झाला तरच हा सामना निकाली ठरेल.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव – 217. न्यूझीलंड पहिला डाव – 99.2 षटकांत सर्वबाद 249 धावा. (डेव्हन कॉनवे 54, केन विल्यमसन 49, टॉम लॅथम 30, टीम साउदी 30, कायल जेमिसन 21, महंमद शमी 4-76, इशांत शर्मा 3-48, रवीचंद्रन अश्विन 2-28, रवींद्र जडेजा 1-20).