कांदा रोपांसह बियाणांचे दर भिडले गगनाला

खर्च करुनही कांद्याच्या भावाला नाही कुठलीच शाश्‍वती; लॉकडाउन काळात शेतकरी हवालदिल

रवींद्र कदम
नगर – जिल्ह्यात प्रतिकूल स्थितीमुळे खरिपातील कांदा रोपांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे कांदा रोपांचे दर गगनाला भिडलेल्याने लागवडीचे नियोजन काही ठिकाणी कोलमडले आहे. त्यामुळे यंदा कांदा लागवड कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे लागवडीच्या कांद्याचे बियाणेदेखील महागले असून, प्रतिकिलो सुमारे 3 ते 4 हजार रुपयांपर्यंत पोहचले आहे. दरम्यान, आधी गडगडले भाव, त्यात करोनाचे संकटात शेतकरी सापडला असून शेतकरी पुर्णत: हवालदील झाला आहे.

जिल्ह्यात खरीप कांद्याचे सरासरी 28 हजार 294 हेक्‍टर कांदा लागवड झाली आहे. यात सर्वाधिक संगमनेर, पारनेर, नगर, कर्जत तालुक्‍यात कांदा लागवड झाली आहे. तर राहुरी, पाथर्डी, राहाता, कोपरगाव, जामखेड या तालुक्‍यात मात्र कांद्याचे प्रमाण कमी आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला जून व जुलैमध्ये लाल कांद्याचे रोप शेतकऱ्यांनी टाकले. मात्र, झाल्येल्या पावसाने रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे यंदा कांदा लागवडीसाठी हवी तशी व पुरेशी रोपे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

तसेच शेतीसाठी मजूर मिळणे अवघड झाल्याने अलीकडे बरेच शेतकरी रोपे तयार न करता थेट शेतात रानबांधणी करून त्यांमध्ये “बी’ फिसकटून, किंवा पेरणी करतात. अशा प्रकारच्या पेरणी पद्धतीचा अवलंब वाढू लागला आहे. शेतकरी सरळ “बी’ पेरून कांदा लागवड करतात कारण दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा तसेच त्यांच्या रोजगाराची वाढ यामुळे लागवड खर्च वाढतो; परंतु या पद्धतीत बी कमी जास्त प्रमाणात पडते.

अशा प्रकारे पेरणी केली तर विरळणी करून योग्य प्रमाणात रोपांची संख्या वाढवली जाते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच गावराण कांद्याच्या ब्याचे मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे गावरान ब्याला ही मागणी वाढली आहे.

 

कांदा पिकाचा एकरी 50 हजार होतो खर्च
कांद्याला जीवनावश्‍यक वस्तू कायद्यातून मुक्त केले आहे. तसेच नुकतीच हॉटेल्स, खानावळी सुरू झाल्या असून काही सुरू होत असल्याने कांद्याची मागणी वाढायला सुरुवात होणार आहे. कांद्याची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात कांद्याला चांगला भाव मिळण्याच्या आशेने अनेक शेतकरी कांदा लागवडीसाठी सरसावले आहेत. यामुळे कांदा रोपांचा तुडवडा जिल्ह्यात जाणवत आहे. तसेच कांदा लगवड परवडत नाही, एकरी 50 हजार खर्च होत असून त्यात पुढे दर वाढून टिकून राहतील का, हा देखील शेतकऱ्यांपुढे प्रश्‍न उभा ठाकला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.