कामशेत खिंडीत धबधब्यांजवळ रस्त्यावरच लावतात वाहने
अपघाताची शक्यता
कामशेत खिंडीत महामार्गाला जागीच वळण व उतार असल्याने याठिकाणी वारंवार अपघात घडत असतात. पावसामुळे या ठिकाणी निर्माण झालेल्या धबधब्यामध्ये भिजण्यासठी महामार्गावरून जाणारे पर्यटक याठिकाणी अचानकपणे थांबतात, तसेच त्यांची वाहने महामार्गावरच लाऊन जात असल्याने महामार्गावरील वाहतुकीस अडथला निर्माण होतो आहे यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व याठिकाणचे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी महामार्गावरील उभी राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच कामशेत खिंड हे अपघातप्रवण क्षेत्र असल्याने महामार्गावर वाहने थांबू नये असे सूचना फलक देखील लावणे गरजेचे आहे.
कामशेत – सध्या मावळातील डोंगरदऱ्या निसर्ग सौंदर्याने नटल्या आहेत. हिरव्यागार डोंगरावरून कोसळणारे धबधबे, जणू काही जमिनीवरच उतरलेले ढग, आल्हाददायक वातावरण एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती करून देते. मावळातील हेच वातावरण पर्यटकांना आकर्षित करत असते. सध्या मावळ परिसरात सर्वत्र मोठ्या संख्येने पर्यटक वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी येताना दिसत आहेत. दरम्यान पर्यटकांचा अतिउत्साह या परिसरात वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरताना दिसत आहे.
जुना मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत खिंडीत पावसाच्या पाण्यामुळे डोंगरातून वाहणाऱ्या पाण्यामुळे छोटे छोटे धबधबे निर्माण झाले आहेत. हे धबधबे पाहण्यासाठी व त्यात भिजण्यासाठी महामार्गावरून जाणारे पर्यटक कामशेत खिंडीत महामार्गारच वाहने लाऊन थांबत असल्याने महामार्गावरील वाहतुकीस अडथला निर्माण होतो आहे. बहुतेक सर्वच वाहने येथे थांबतात. काहीजण धबधब्यांचा आनंद घेतात तर काही केवळ फोटो काढून पुढे मार्गस्थ होतात. यामुळे या खिंडीत वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.