कॅन्टोन्मेंट – सर्व जाती-धर्माच्या मतदारांचा समावेश असलेला (कॉस्मोपॉलिटीन) मतदारसंघ म्हणून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. ही बाब लक्षात घेऊन मतदारांच्या आपेक्षा तसेच त्यांच्या संकल्पना जाणून घेण्यासाठी भाजप, शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांच्याकडून व्यक्तिगत गाठीभेटींवर भर देण्यात येत आहे.
दरम्यान, कांबळे यांच्या या भेटींना मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत आहे. तसेच, कांबळे यांच्या रुपाने नवा चेहरा मतदारसंघातून आल्याने मतदारांकडूनही त्यांचे स्वागत केले जात असल्याचे चित्र आहे.
कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विविध जाती-धर्माचे नागरिक आहेत. त्यांच्या आशा-आकांक्षा जाणून घेण्यासाठी कांबळे यांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. विविध समाजाची प्रार्थनास्थळे, सामाजिक संघटना, धार्मिक संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना भेट देत कांबळे यांच्याकडून गेल्या 3 ते 4 दिवसांपासून भेट घेतली जात आहे. या भेटीमध्ये प्रत्येक समाजाच्या समस्या, त्यांच्या गरजा, त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा तसेच त्यांचे प्रश्न कांबळे यांच्याकडून जाणून घेतले जात असून त्यानुसारच त्यांच्याकडून प्रचाराची रणनीती ठरविण्यात येत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
गेल्या 5 वर्षांत या मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक वस्ती तसेच घरामध्ये पाण्याची व्यवस्था, शौचालयाची सुविधा पुरविण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात संस्था, संघटनांच्या भेटी घेताना मोठा फायदा होत असून मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले, तसेच पुढील दोन दिवसांत प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचेही ते म्हणाले.