स्थायी समिती अध्यक्षपदासाठी कांबळे, स्मिता कोंढरे यांना उमेदवारी

कांबळेंच्या घोषणेची औपचारिकता : पाच मार्चला होणार निवडणूक

पुणे – महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सेना-भाजपकडून सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली असून, कॉंग्रेस-राष्ट्रवादीतर्फे स्मिता कोंढरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोघांनीही नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे गुरुवारी अर्ज दाखल केले.

साहजिकच महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने कांबळे हेच अध्यक्षपदी बसणार आहेत. पाच मार्च रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कांबळेंच्या नावाची घोषणा होण्याची औपचारिकता राहणार आहे. कांबळे यांनी दोन अर्ज दाखल केले असून, त्यातील एका अर्जात हेमंत रासने सूचक आणि दिलीप वेडे-पाटील अनुमोदक आहेत तर दुसऱ्या अर्जात रंजना टिळेकर सूचक आणि उमेश गायकवाड अनुमोदक आहेत. कोंढरे यांच्या एका अर्जात महेंद्र पठारे सूचक आहेत तर वैशाली मराठे अनुमोदक आहेत. दुसऱ्या अर्जात लक्ष्मी दुधाणे सूचक तर अशोक कांबळे अनुमोदक आहेत.

अध्यक्षपदासाठी हेमंत रासने आणि सुनील कांबळे यांच्यामध्ये चुरस असल्याचे बोलले जात होते. रासने यांना स्थायी समिती सदस्यपद दिले आणि कांबळे यांचा स्थायी समितीतील कार्यकाळ संपला असतानाही त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठीच ही संधी दिल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.

पाच मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये कांबळे यांच्या नावाची औपचारिक घोषणा होईल. कांबळे यांचा अर्ज दाखल करताना महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, स्थायी समितीतील सदस्य, अन्य नगरसेवक उपस्थित होते.

कोंढरे यांचा अर्ज दाखल करताना विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक चेतन तुपे अन्य नगरसेवक उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)