पुणे, [प्रभात वृत्तसेवा] – मंगळवार पेठेतील महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयात बुधवारी सकाळी झालेल्या गोंधळानंतर दुपारपर्यंत रुग्णालय बंद करण्यात आले होते.
मात्र, पोलिसांकडून कसून तपासणी झाल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले असून, त्या ठिकाणी २१० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य प्रमुख डाॅ. कल्पना बळीवंत यांनी दिली.
रुग्णालयात तीन बांग्लादेशी नागरिक घुसल्याची अफवा पसरल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता, तर या तीनही नागरिकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी रुग्णालय आतून, तसेच बाहेरूनही अचानक बंद केल्याने या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडाली होती.
महापालिकेनेही रुग्णांना हलविण्याची तयारी केली होती. दरम्यान, या प्रकारानंतर रुग्णालयात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांच्याकडे सादर केला आहे.
याप्रकरणी पोलिसांना सर्व सहकार्य करण्यात येत आहे. त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून, रुग्णालयाची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. – पृथ्वीराज बी. पी ( अतिरिक्त आयुक्त)