-वंदना बर्वे
अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा शपथवधी पार पडताच भारतात बऱ्याच ठिकाणी जल्लोष करण्यात आला. पण त्या स्वतःला कितपत भारतीय मानतात, हा विचार आपण भारतीयांनी करणे गरजेचे आहे.
कमला हॅरिस यांनी तिकडे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आणि इकडे भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कमला हॅरिस यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यापासूनच भारतीयांचे पाय जमिनीवर नाहीत. एक भारतीय वंशाची मुलगी अमेरिकेची उपराष्ट्रपती झाली याचा सर्वांना खूप आनंद झाला आहे. मात्र, हीच भावना कमला हॅरिस यांच्या मनात आहे का? त्या स्वतःला खरंच भारतीय वंशाच्या समजतात का? हा खरा प्रश्न आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्यासोबतच कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाची नुकतीच शपथ घेतली. कमला हॅरिस यांचा तिकडे शपथविधी सोहळा सुरू होता तेव्हा चेन्नईसह विविध ठिकाणी फटाके फोडले जात होते. पूजापाठ केली जात होती. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षा झाल्या याचा भारतीयांना खूप आनंद झाला. कारण, कमला हॅरिस यांची आई श्यामला गोपालन यांचा जन्म चेन्नईत झाला. त्या अमेरिकेत गेल्या आणि डोनाल्ड हॅरिस यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कमला हॅरिस त्यांची कन्या.
एका भारतीय आईच्या पोटी कमला हॅरिस यांचा जन्म झाला म्हणून त्या भारतीय वंशाच्या आणि याचाच भारतीयांना आनंद झाला आहे. कारण, हीच भारतीय संस्कृती आहे. दुसऱ्यांच्या आनंदातही आपला आनंद शोधणे. मात्र, आपण उपराष्ट्रपती झालो याचा आनंदोत्सव भारतात साजरा केला जातोय याचा कमला हॅरिस यांना आनंद झाला असेल काय? हा खरा प्रश्न आहे. भारतीय त्यांना भारतीय वंशाचे मानतात. परंतु, त्या स्वतःला भारतीय वंशाच्या समजतात काय? आणि तसं जर त्या समजत नसतील तर आपलं आनंदी होणं अकारण नाही काय? असा प्रश्न सहज निर्माण होतो.
कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर अमेरिकेतील एका महिला पत्रकाराने त्यांची छोटेखानी मुलाखत घेतली. आपल्याला भारताविषयी काय वाटतं? असा प्रश्न विचारला. कमला हॅरिस यांनी फार प्रॅक्टीकल उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “भारत हा खूप चांगला देश आहे. विविध धर्म आणि संस्कृतींना सामावून घेणारा देश आहे.’ मी भारतीय वंशाची आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. मला भारतात जायला खूप आवडतं. इथलं खान-पान वगैरे वगैरे अशाप्रकारचं काहीही त्या बोलल्या नाहीत.
एक देश म्हणून भारताप्रती कमला हॅरिस यांच्या मनात आदर आहे. परंतु, आपण भारतीय वंशाच्या आहोत असं काही त्यांना अजिबात वाटत नाही. ही बाब त्या मुलाखतीतून स्पष्टपणे जाणवते. कमला हॅरिस स्वतःला चोवीस कॅरेट अमेरिकन समजतात आणि केवळ त्याच समजतात असं नाही तर, बॉबी जिंदाल यांनीही “आय ऍम अमेरिकन’ असं म्हटलं होतं. आणि यात काही गैरसुद्धा नाही. फक्त आपणच किती भावनात्मक आहोत याची जाणीव यातून होते, एवढंच!
नुकतेच एका मासिकाच्या कव्हरपेजवरून त्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आल्या. कमला हॅरिस यांचा फोटो जास्त उजळ केल्याचा एक नवा वाद पुढे आला. कारण अमेरिकेत श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय असा भेद कमी झाला नसल्याचे नुकत्याच काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर कमला हॅरिस यांचा चेहरा आहे त्यापेक्षा गोरा करून त्यांना “अमेरिकेची कातडी’ चिकटवण्याचा हा एक प्रयत्न असावा. त्यामुळे “भारतीय वंशाच्या’ असा त्यांना “टॅग’ चिकटवणे कितपत योग्य आहे, याचा विचार आपण भारतीयांनी करायला हवा. अनेक भारतीय अमेरिकेत पिढ्यान्पिढ्या स्थायिक आहेत. ते केवळ पर्यटन म्हणून भारत फिरण्यास येतात, ही वस्तुस्थिती आहे. कमला हॅरिस यासुद्धा अमेरिकेत निवडून आल्यानंतर बराच कालावधी उलटला आहे. शिवाय अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी आरूढ होऊनही काही कालावधी लोटला आहे, तरी त्यांनी भारतास सदिच्छा भेट दिलेली नाही. त्यामुळे त्यांचा विजयोत्सव साजरा करणाऱ्या आपल्या लोकांनी हे चित्र उघड्या डोळ्यांनी पाहायला पाहिजे.
तरीही भारतीय संस्कृती आणि वृत्तीनुसार आपण आपल्या भारतीय असण्याचा सार्थ अभिमान बाळगतो. आपल्यातीलच एक अमेरिकेत उच्चपदस्थ आहे, हेही नसे थोडके. त्यामुळे कमला हॅरिस स्वतःस भारतीय वंशाच्या समजत असतील किंवा नासतील तरीही आम्हास त्यांच्याविषयी आमच्या मनात कायम अभिमान राहील, कारण हीच आपली भारतीय संस्कृती आहे.