अध्यक्षीय निवडणुकीच्या स्पर्धेत कमला हॅरीस यांची आघाडी

वॉशिंग्टन – अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅट पक्षाची उमेदवारी मिळवणाऱ्यांच्या 20 इच्छुकांमध्ये भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी आता दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. अमेरिकेत पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणूक होत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी माजी उपाध्यक्ष जो बिडेन हे पहिल्या स्थानावर आहेत. त्यांच्या नंतर कमला हॅरीस यांना स्थान मिळाले आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या फ्लोरिडा येथे झालेल्या चर्चेच्यावेळी कमला हॅरीस यांनी अत्यंत चांगला परफॉर्मन्स दिल्याने त्यांना मिळालेल्या पसंतीच्या मतांमध्ये मोठीच वाढ झाली आहे. त्यांना या ओपिनीयन पोल मध्ये 22 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे या स्पर्धेत पुढीलकाळात त्यांना डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची संधी अजून खुली आहे. जो बिडेन यांच्याशी त्यांना या बाबतीत कडवी लढत द्यावी लागणार आहे. 11 जुनला घेण्यात आलेल्या ओपिनियन पोल मध्ये कमला हॅरीस यांना केवळ 7 टक्के मते मिळाली होती. तर बिडेन यांना 30 टक्के मते मिळाली होती.

कमला हॅरीस 54 वर्षीय असून त्यांच्या मातोश्री तामिळनाडुच्या आहेत तर त्यांचे वडिल जमैकाचे आहेत. ते ऍफ्रो-अमेरिकन आहेत. हॅरीस यांनी जानेवारी महिन्यात अध्यक्षीय उमेदवारीसाठी आपली प्रचार मोहीम सुरू केली होती. जर त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्या निवडून आल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील. सध्या त्या अमेरिकेच्या संसद सदस्य आहेत. आणि त्या दोन वर्षांपुर्वी कॅलिफोनिर्यातून निवडून आल्या आहेत. अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या भूमिकेच्या विरोधात त्यांनी अत्यंत कडक भुमिका घेतल्याने त्या चर्चेत आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.