पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने काॅंग्रेसच्या माजी नगरसेविका आणि शहराच्या पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे यांनी पक्षाला रामराम केला आहे.
व्यवहारे या गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत होत्या. मात्र, पक्षाकडून चुकीच्या पध्दतीने उमेदवारी दिली जात असल्याने तसेच निष्ठावंताना डावलले जात असल्याने राजीनामा दिल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. येत्या सोमवारी ( दि.२८ रोजी) कसबा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
दरम्यान, व्यवहारे यांनी नुकतीच स्वराज्य पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी खासदार संभाजीराजे छपत्रती यांची भेट घेतली होती. त्यामुळे व्यवहारे या स्वराज्य पक्षाकडून लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांनी आपण अपक्षच लढणार असून संभाजीराजे छपत्रती यांनी पाठिंबा द्यावा यासाठी त्यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काॅंग्रेसकडून महिलांना संधी दिली जात नसल्याचे चित्र आहे. पुण्यातून १९९४ मध्ये अॅड. वंदना चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यानंतर गेली ३० वर्षे पक्षाकडून पुण्यात एकाही महिला उमेदवाराला उमेदवारीची संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण कसब्यातून उमेदवारी मागितली होती. मात्र, जे पक्षाला आपला समजत नाहीत, त्यांनाच संधी दिली गेली हे दुर्दैव आहे. – कमल व्यवहारे, माजी महापौर