भोपाळ -मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते कमल नाथ यांनी त्या राज्याच्या मंत्री इमरती देवी यांचा उल्लेख आयटम म्हणून केल्याने राजकीय वादंग निर्माण झाले आहे.
दरम्यान, राजकीय वादंग निर्माण झाल्याने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अखेर माफी मागितली आहे.
कमलनाथ म्हणाले की,’मी अनादर करणारं वक्तव्य केलं…कोणतं वक्तव्य? पण जर कोणाला तसं वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.’
ते पुढे म्हणाले,’भाजपाला आपला पराभव होणार असल्याची जाणीव झाली आहे. यामुळेच मूळ मुद्द्यांवरुन जनतेला भरकटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते बोलू देत, मी त्यांना यश मिळू देणार नाही,” असं कमलनाथ यांनी म्हटलं आहे.
मध्यप्रदेशात सध्या विधानसभा पोटनिवडणुकांमुळे सत्तारूढ भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच रविवारी झालेल्या सभेत बोलताना कमल नाथ यांनी भाजपने उमेदवारी दिलेल्या मंत्री इमरती देवी यांच्याविषयी वाद निर्माण करणारी टिप्पणी केली होती.
तत्पूर्वी, कमल नाथ यांचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, खासदार ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर भाजप नेत्यांनी धरणे आंदोलनाचा भाग म्हणून मौन व्रत केले होते.