सत्ता टिकविण्यासाठी कमलनाथ सतर्क; मंत्र्यांना सावध राहण्याची सूचना

भोपाळ: मध्य प्रदेशातील सरकार कोसळण्याच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सर्व मंत्र्यांना सावध राहण्याची सूचना केली आहे. विरोधकांचे कट हाणून पाडा असे कमलनाथ यांनी मंत्र्यांना सांगितले आहे. कामाच्या अतिभारामुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा दावा कमलनाथ यांनी केला आहे. तसेच पुत्रप्रेमावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुनावल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकार 5 वर्षांपर्यंत चालणार असून आम्ही अनेकदा बहुमत सिद्ध केले आहे. संघटनात्मक बदलांबद्दल पक्षच निर्णय घेणार असल्याचा दावा मंत्री आरिफ अकील यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पहिल्यांदाच मंत्र्यांसोबत बैठक घेतली. निवडणुकीत राज्यातील 29 पैकी 28 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपने विजय मिळविला आहे. कॉंग्रेसला केवळ छिंदवाडामध्ये विजय मिळू शकला. तर ज्योतिरादित्य सिंधिया यांना
स्वतःचा बालेकिल्ला राखता आला नाही.

मध्य प्रदेश विधानसभेत एकूण 230 जागा आहेत. 2018 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने 114 जागांवर विजय मिळविला होता. 4 अपक्ष, बसपचे 2 आणि सपच्या एका आमदाराने पाठिंबा दिल्याने कॉंग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला होता. कमलनाथ सरकारला सध्या 121 आमदारांचे समर्थन आहे. तर भाजपकडे 109 आमदार आहेत. भाजपला अन्य 7 आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास कॉंग्रेसचे सरकार कोसळू शकते. दरम्यान भाजप घोडेबाजारावर विश्वास ठेवत नाही. पण कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे काहीही घडू शकते असा दावा माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×