कामाचे ना धामाचे अन्‌ काहीच होईना बिगर दामाचे

तालुक्‍यात महसूल प्रशासनाकडून जनतेची पिळवणूक

जालिंदर आदक
तळेगाव ढमढेरे (पुणे) – शिरूर तालुक्‍यात गेल्या वर्षी विधानसभा निवडणूकीत खांदापलट झाली. परंतु तालुक्‍यातील सर्वसामान्य जनतेचे मूळ प्रश्‍न अद्याप जैसे थे राहिले आहेत. शासन दरबारी ग्रामपंचायत, तलाठी, महावितरण तसेच शासकीय कार्यालयांत सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक होत आहे. त्यामुळे कामाचे ना धामाचे, काहीच होईना बिगर दामाचे, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

माजी आमदारांच्या निष्क्रियेतेमुळे तालुक्‍यातील जनतेने त्यांना डावलून कार्यसम्राट आमदारांना निवडून दिले आणि तालुक्‍यात कामाचे ढोल बदडायला सुरवात झाली. खासदार निवडून दिल्यापासून काही ठिकाणे सोडली तर अद्याप फिरकलेलेच नाहीत. परंतु सर्वसामान्य जनतेला आपली कामे दाम दिल्याशिवाय होत नाहीत, हे मात्र सर्वसामान्यांच्या पाचवीला पुजले आहे. एका कामासाठी नागरिकांना वर्षानुवर्षे हेलपाटे मारावे लागतात. तालुक्‍यातील तलाठी, महसूल प्रशासनाकडून जनतेची पिळवणूक केली जात आहे. गावनेते, पुढारी, पदाधिकारी यांचे कोणतेही सरकारी कागदपत्रांचे काम अगदी काही मिनिटांतच केले जाते. मात्र सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे आमदार, खासदारंनी लक्ष घालण्याची गरज आहे.

बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यात सरकार कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच तालुक्‍यात खासदार, आमदारांचा वचक राहिलेला दिसून येत नाही. याबाबत घेण्यात येणारा जनता दरबार घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित महावितरण विभागाची कामे का होत नाही, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. याबाबत स्थानिक आमदार, खासदार याकडे लक्ष देणार का? सर्व सामान्य जनतेची होणारी पुळवणूक कधी थांबणार, अशी चर्चा सध्या तालुक्‍यात रंगली आहे. तालुक्‍यात आमदार, खासदारांनी लक्ष घातले तर जनतेची होणारी पिळवणूक थांबण्यास मदत होईल. सर्वसामान्य जनतेचे वर्षानुवर्षे रखडलेली कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

हे करा-
– खासदार, आमदारांनी जनतेचे प्रश्‍न जाणून घ्यावेत.
– तालुका दक्षता कमिटीचे काम प्रभावीपणे व्हावे.
– नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करा.
– आमदारांनी विभागीय कार्यालय उघडून प्रश्‍न सोडवावेत.

असे होईल
– आमसभा घेतल्यास नागरिकांचे प्रश्‍न सुटतील
– विविध खात्यामार्फत होणारी पिळवणूक थांबेल.
– भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल
– सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक मिळेल

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.