पुणे – पुण्यात 19 डिसेंबर झालेल्या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी वादग्रस्त धार्मिक नेता कालीचरण महाराज याला रायपूरमधून अटक केली. शुक्रवार पेठेतील नातूबागमध्ये समस्त हिंदुत्व आघाडीने अफझल खानाचा छत्रपती शिवरायांनी केलेल्या वधाचा स्मरणदीन साजरा केला. त्यात कालीचरणने वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
या कार्यक्रांची व्हिडिओ क्लिप तपासल्यानंतर 28 डिसेंबरला खडक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. कालीचरणसह अन्य चार आरोपींवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. यात कॅप्टन दिगेंद्रकुमार यांचा समावेश आहे. त्यांनी कारगील युध्दात सहभाग घेतला होता. कारगीलमध्ये दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना 1999 मध्ये महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. तेही या कार्यक्रमात वक्ते होते.
कालीचरण महाराज उर्फ अभिजित सरग हा विदर्भातील अकोल्याचा मुळचा रहिवासी आहे. त्याला महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याच्या आरोपावरून अलीकडेच अटक करण्यात आली होती. नुकतीचा त्याची जामिनावर सुटका झाली होती. अशाच स्वरूपाचे आक्षेपार्ह वकक्तव्य त्याने पुण्यात केले होते.
पुणे पोलिसांच्या पथकाने कालीचरणला रायपूरमध्ये अटक केली आहे. त्याला पुण्यात आणून न्यायालयात हजर केले जाईल.