कलबुर्गी हत्या प्रकरणी “एसआयटी’कडून आरोपपत्र दाखल

बेंगळूरु – पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या गणेश मिस्कीन यानेच ऑगस्ट 2015 मध्ये विचारवंत आणि संशोधक डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्यावरही गोळ्या झाडल्या, असा आरोप विशेष तपास पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे. डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या “एसआयटी’ने आज हुबळी-धारवाड येथील जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

गणेश मिस्कीनव्यतिरिक्‍त अमोल काळे, प्रवीण प्रकाश चतुर, वासुदेव भगवान सुर्यवंशी, शरद कळसकर आणि अमिथ रामचंद्र बड्डी यांचा “एसआयटी’च्या आरोपपत्रामध्ये आरोपी म्हणून उल्लेख आहे.

कलबुर्गी यांनी बेंगळूरुमध्ये विज्ञान भवनात झालेल्या कर्नाटकातील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंमलबजावणी या विषयावरील परिसंवादात 9 जून 2014 रोजी केलेले बीजभाषण हेच त्यांच्या हत्येचे मूळ कारण असल्याचे निरीक्षण “एसआयटी’ने नोंदवले आहे.

या भाषणाच्या आधारे या सर्वांनी कलबुर्गी यांना “दुर्जन’ ठरवले होते. त्यांनी मिळून कलबुर्गी यांच्या हत्येचा कट केला आणि त्याप्रमाणे कलबुर्गी यांची हत्या केली, असेही “एसआयटी’ने म्हटले आहे.

सर्व संबंधितांनी हत्येसाठी एक मोटरसायकल चोरली, कलबुर्गी यांच्या घराची पहाणी केली. दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या पोइलाथाबेट्टू गावात हत्येचा सरावही केला.

प्रवीण चतुर आणि गणेश मिस्कीन हे 30 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 8.30 वाजता कलबुर्गी यांच्या घरी पोहोचले. गणेश मिस्कीनने कलबुर्गी यांच्यावर कपाळावर दोन गोळ्या झाडल्या, असे “एसआयटी’ने म्हटले आहे.

याच टोळीने कथितरित्या 5 सप्टेंबर 2017 रोजी संध्याकाळी पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या केली. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या दोन्ही हत्यांचा देशभर निषेध झाला होता.

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात गणेश मिस्कीनने मोटरसायकल चालवली तर परशुराम वाघमारे या अन्य आरोपीने गोळ्या झाडल्या. काडतुसे आणि त्यांच्या पुंगळ्याच्या आधारे या दोन्ही हत्यांमध्ये एकाच देशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर झाल्याचे निष्पन्न होते. त्यामुळे या हत्यांमागे एकच गट असल्याचा निष्कर्श काढण्यात आला आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कलबुर्गी यांच्याही हत्येच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×