कलंदर: बदल आत्मसात होतोय

उत्तम पिंगळे

रविवारी प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो तर सरांच्या चेहऱ्यावर हास्य होते. मी बसताच त्यांनी मला वृत्तपत्रामधील बजाज चेतकची बातमी दाखविली व बजाज चेतक पुन्हा रस्त्यावर येणार. मी मानेनेच होकार दिला. सरांनी मला तो हमारा बजाज जाहिरातीचा व्हिडिओ दाखवला. ये जमी ये आसमान… ने सुरुवात होऊन नंतर बुलंद भारत की बुलंद तसवीरे.. हमारा बजाजने सांगता होते.खूप छान जाहिरात होती ती. सर काही क्षण असेच बोलत राहिले व नंतर भरभरून बजाज चेतक विषयी बोलू लागले.

त्या वेळी म्हणजे एकोणीसशे सत्तर साली वगैरे बजाज स्कूटरला खूप मागणी असे. चेतक बहात्तर साली बाजारात आली. आधी तर चेतक फक्‍त निर्यातीस असे मग नंतर ती भारतीयांनाही मोकळी केली गेली. त्यासाठी आपण काही पैसे आधी भरून मागणी आगाऊ नोंदवायची असे. मग कित्येक महिने व वर्षेही आपला नंबर मिळण्याकरता जात असे. त्यावेळी आजच्यासारखी उत्पादन पद्धती भारतात नव्हती व सर्व काही कडक प्रकारे नियमात साचेबद्ध चालू असे. कित्येकांनी तर अशावेळी बजाज चेतकचा नंबर दुसऱ्या मित्रास देऊन त्याकडून जास्तीचे पैसे घेऊन घरात टेबल फॅन, फर्निचर, कपाट अशा गोष्टी विकत घेतल्या.

तीच गोष्ट दूरध्वनी किंवा गॅस कनेक्‍शनच्या बाबतीत होती. कित्येक काळ लोटल्यावर नंबर लागत असे. मग जर नंबर मिळाला तर तो दुसऱ्याला ऑन पैसे घेऊन दिला जात असे व कित्येकांनी अशाप्रकारे पैसेही कमवले होते. अर्थात जमाना वेगळाच होता.बजाज चेतक इतर स्कूटरच्या मानाने दणकट व उंच होती त्यामुळे त्या गाडीची शान वेगळीच असे. घरी चेतक असणे हा एक वेगळाच रुबाब होता. चेतक घेऊन ऑफिसला जाणारा म्हणजे कमालच वाटे एखादवेळी त्याच्या मागे बसावयास मिळणेही अप्रुप वाटे.

पुढे 1991 नंतर अर्थव्यवस्था हळूहळू खुली केली गेली व इतर अनेक परदेशी कंपन्या भारतात यायला सुरुवात झाली. होंडा, कावासाकी यांच्याही बाइक बाजारात दिसू लागल्या.हळूहळू स्कूटरची जागा मोटारसायकलने घ्यायला सुरुवात केली. याचे मुख्य कारण म्हणजे मोटर सायकलचे मायलेज स्कूस्टरच्या तुलनेने खूपच जास्त होते. तसेच मोटारसायकलचे चाक हे मोठे असल्यामुळे रस्त्यातील छोटे मोठे खड्डे सहज पार केले जात. मग स्कूटरची मागणी हळूहळू कमी होऊ लागली व बजाजनेही चेतक मॉडेल 2006 साली पूर्ण बंद केले.

पण असे करताना कावासाकी बजाजने मोटारसायकलच्या मार्केटमध्ये मोठा जम बसवला होता व आजही आहे. कित्येक देशात बाजाजच्या मोटारसायकल निर्यात होत आहेत. आपण पाहतो की वाहन निर्मितीतील जुन्या प्रिमिअर किंवा हिंदुस्तान मोटार्सची ऍम्बेसेडर व महाराष्ट्र स्कूटर ऍपी अशा अनेक कंपन्या बंद पडल्या कारण त्या बदलांच्या सामोऱ्या गेल्या नाही. बाजाजने मात्र योग्य वेळी बदल करून आपले वर्चस्व मोटरसायकलमध्येही चांगले ठेवलेले आहे. बाजारात प्रत्येक वस्तूचे एक लाइफ सायकल असते. ते वाढत जाऊन कमाल वर आले की खाली जाऊन स्थिर राहिले तर ठीक. पण खाली खाली येऊ लागले याचा अर्थ ती वस्तू लवकरच हद्दपार होणार हे समजावे.

असो आता सरकारने विद्युत वाहनांना प्रोत्साहन द्यायचे ठरवले असल्यामुळे या ठिकाणी नवनवी वाहने येऊ लागले आहेत. हुंदाईची विद्युत कार 23 लाख व महिंद्राची साडेसहा लाखांचा आसपास आहे. आता रोज ऑफिसमध्ये जवळपास जाणाऱ्यांना अशी ही इलेक्‍ट्रिक चेतक सोपी व सोयीस्कर होईल कारण यामध्ये रस्त्यांवरील प्रदूषण नसणार व रहदारीलाही कमी अडथळा होईल. हमारा बजाज पुन्हा येत आहे याचे त्यामुळेच कौतुक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.