महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांची माहिती
मंचर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंबेगावातील कळंब गावाबाहेरुन जाणाऱ्या बायपासच्या दुसऱ्या लेनचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल. त्यानंतर रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक इंजिनिअर दिलीप मेदगे यांनी दिली.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक इंजिनिअर दिलीप मेदगे यांनी कळंब येथील बायपास रस्तासह जुन्या रस्त्याची प्रत्यक्षात पाहणी केली. रवीकिरण हॉटेलपासून सुरू होणारा हा बायपास वर्पेमळा येथे संपतो. 3.80 किलोमीटर याची एकूण लांबी असून, यावरती घोडनदीवरती बांधण्यात आलेला चार लेनचा, 24 मीटर रुंदी व 130 मीटर लांबीचा पूल पूर्ण झाला असून त्याची एक लाईन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
नदीवरील मोठ्या पुलाच्या कामाला पंधरा महिने लागले. सुरुवातीच्या काळात शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी बंधाऱ्यातील पाणी सोडता आला नाही. त्यामुळे पुलाच्या कामाला प्रत्यक्षात नऊ महिनेच वेळ मिळाला. व्ही. एम. म्हात्रे, कंपनीचे संचालक श्रीकांत मातेरे व प्रकल्प मॅनेजर इंजिनिअर अविनाश नेवारे यांनी याबाबत मेदगे यांना माहिती दिली. यावेळी प्रकल्पाचे लायझनिंग ऑफिसर हेमंत हांडे उपस्थित होते. प्रकल्पाला राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक संजय कदम यांचे चांगले मार्गदर्शन होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळत आहे.
उर्वरित काम एक महिन्यांमध्ये पूर्ण होणार असून, दुसरी लेन पूर्ण झाल्यामुळे तीन मिनिटांमध्ये या बायपास वरून नारायणगावकडे जाणाऱ्या मार्गावरती जाता येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्वीच्या बंद पडलेल्या या खेडघाट, खेड, मंचर, कळब, नारायणगाव, आळेफाटा या सर्वच बायपासची तातडीने नवीन टेंडर प्रक्रिया करून 340 कोटी रुपये निधी तातडीने उपलब्ध करून दिला आहे.
भविष्यातील अपघात टाळण्यासाठी यासाठीच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहे. असे महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे यांनी एकलहरे कळंब येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले.