काकड आरती सोहळ्याची चिंबळीत सांगता

महिनाभर पहाटे रंगत होते, विविध धार्मिक कार्यक्रम

चिंबळी – येथील सावता महाराज व हनुमान मंदिरात महिनाभर सुरू असलेल्या पहाटेच्या काकड आरती सोहळ्याची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यावेळी सांगता सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कोजागरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमेअखेर महिनाभराच्या कालावधीत दररोज पहाटे चार ते साडेसहा या वेळेत हा काकड आरतीचा विधिवत कार्यक्रम झाला.

यामध्ये राधा कृष्ण, श्री जोतिबा, संत बाळूमामा आदी देवदेवतांच्या विविध रूपातील आकर्षक पूजा बांधण्यात आल्या. यासाठी ग्रामस्थांनी ठरविल्याप्रमाणे अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती. दरम्यान, चिंबळीत अनेक वर्षांपासून अशी काकड आरतीची परंपरा असल्याने या सोहळ्यादरम्यान पहाटेच्या वेळी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी रीघ लागलेली असते. काकड आरती समाप्ती निमित्ताने सकाळी सात वाजता तुळशी विवाह साजरा करण्यात आला होता तर मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर सकाळी 11 ते 1 हभप बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद पार पडला.

तसेच सावता महाराज मंदिर, पदमावती भजनी मंडळ, तरूण मंडळाच्या वतीने काल्याचे किर्तन व विठ्ठल-रुक्‍मिणी, श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज व सावता महाराजांच्या प्रतिमेची टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढून महापसादाने काकड आरतीची सांगता करण्यात आली. त्याचप्रमाणे कुरुळी येथे विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात रंगीबेरंगी रांगोळी काढून टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी मिरवणूक व काल्याचे किर्तन व महाप्रसाद प्रसादाने सांगता करण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.