उस्मानाबाद-कळंबमध्ये सेनेकडून कैलास पाटील यांना उमेदवारी

उस्मानाबाद: सरपंच, जिल्हापरिषद सदस्य ते शिवसेना जिल्हाप्रमुख असा प्रवास केलेल्या कैलास पाटील यांना शिवसेने उमेदवारी दिली आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते विधानसभेचा उमेदवार असा कैलास पाटील यांचा प्रवास असुन त्यांच्या उमेदवारीवरुन इच्छुकांमध्ये नाराजीचा सुर उमटत असल्याचे चित्र आहे.

सोमवारपासुन ए.बी.फॉर्म मिळुनही उमेदवारीवर शिक्कामोर्तब होत नव्हते,पण यामध्ये कैलास पाटील यांनी बाजी मारली आहे. कैलास पाटील यांचे मुळ गाव कळंब तालुक्यातील देवधानोरा आहे. गेल्या काही वर्षापासून कळंब तालुक्याल‍ा प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. यानिमित्तानं ती इच्छा सुध्दा पुर्ण करुन पक्षाने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. कैलास पाटलांची राजकारणातील सूरुवात सारोळा बु. (ता. उस्मानाबाद) गावाचे सरपंच म्हणुन झाली.

राष्ट्रवादीचा एकनिष्ट कार्यकर्ता म्हणुन स्वतःची प्रतिमा तयार करण्यात त्यानी यश मिळविले होते, सांजा जिल्हा परिषद गटावर त्यानी वर्चस्व ठेवले होते, तरीही जिल्हा परिषदेची उमेदवारी राष्ट्रवादीकडुन न मिळाल्याने ऐनवेळी त्यानी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सेनेतुन निवडणुक लढविली. या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने त्यानी विजयश्री खेचली. त्यांनी एस.टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांचे चिंरजीव आदित्य गोरे यांचा पराभव केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात ते चांगलेच चर्चेत आले. अगोदरचा इतिहास पाहुन त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली.

जलसंधारण मंत्री प्रा. तानाजी सावंत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही कैलास पाटील यांच्या पारड्यात वजन टाकल्याने इतर इच्छुकांचा भ्रमनिरास झाल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.