अबाऊट टर्न: कैफियत

हिमांशू

“बजरंगी भाईजान’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने रंगवलेला, बातमीसाठी वेडापिसा झालेला पाकिस्तानी रिपोर्टर आठवतोय? लोक म्हणतात, बातमीदारीत संवेदनशीलता राहिलेली नाही. रिपोर्टर कुणालाही काहीही प्रश्‍न विचारतात. मनस्थितीचा विचार करत नाहीत. नवाजुद्दीन सुरुवातीला बातमी मिळवण्यासाठी उतावीळ दाखवलाय; पण नंतर तोच संवेदनशीलपणे वास्तवाला वाचा फोडताना दिसतो. त्यानंतर एक खराखुरा “संवेदनशील’ पाकिस्तानी रिपोर्टर पाहायला मिळाला.

पुराच्या पाण्यात घुसून रिपोर्टिंग करणाऱ्या अझदार हुसैनला पाहून मुंबईची पत्रकारिता किती “मागे’ आहे, याचा बोध होतो. खरंतर अझदार हुसैन रिपोर्टिंग करताना “दिसतो’ असं म्हणणं चुकीचंच ठरेल. कारण त्याचा फक्त चेहरा आणि हातातला बूम दिसतोय. उर्वरित संपूर्ण रिपोर्टर पाण्यात आहे. पुराची भयावहता दाखवताना हा पठ्ठ्या गळ्यापर्यंत पाण्यात शिरला.

हा व्हिडिओ पाहून मुंबईत छत्र्या, रेनकोटचा आधार घेऊन पुराच्या बातम्या दाखवणारे रिपोर्टर आठवले. साचलेलं पाणी गुडघ्यापर्यंत आहे की कमरेपर्यंत, हे दाखवण्यासाठी आपले रिपोर्टर पाण्यात का शिरत नाहीत, असा प्रश्‍न पडला. मग वाटलं, आपल्याकडे गटाराची झाकणं उघडी असतात. पाण्यात शिरलेला रिपोर्टर बूमसकट कधी गायब होईल सांगता येत नाही. परिस्थितीचं गांभीर्य समजलं नाही तरी चालेल; पण भलती रिस्क नको. रिपोर्टर सलामत तो बातम्या पचास! उघड्या गटारात कुणीतरी पडेपर्यंत वाट पाहणाऱ्या मोबाइलबहाद्दरांकडून क्‍लिप मिळवता येते. शिवाय, फुटाफुटावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेतच!

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मोठा पूर आलाय. हजारो एकर शेतांमधील उभी पिकं पाण्याखाली गेलेली असताना, पाण्याचा स्तर वाढत चालला असताना, नागरी वस्त्यांमध्ये कधीही पाणी शिरू शकेल, अशी परिस्थिती असताना अझदार हुसैन थेट पाण्यात उतरला. तत्पूर्वी त्यानं काठावरच्या लोकांशी संवाद साधला. पूरस्थिती उद्‌भवण्यापूर्वी आमच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असं लोकांनी त्याला सांगितलं. स्थानिकांची ही कैफियत या रिपोर्टरने गळाभर पाण्यात उभं राहून मांडली.

मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी तातडीनं लक्ष घातलं नाही, तर आम्ही बरबाद होऊ, असं स्थानिकांचं म्हणणंसुद्धा त्याने पाण्यातूनच ऐकवलं. इम्रान खान स्वतःच गळाभर पाण्यात उभे आहेत, हे तिथल्या पत्रकारांना अजून खरं वाटत नसावं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणार नाही, अशी शपथ घेऊन ते सत्तेवर आले. परंतु कर्ज घेण्याखेरीज तरणोपाय नाही, हे त्यांना थोड्याच दिवसांत समजलं. अखेर जनतेवर महागाई आणि करांचा मोठ्ठा बोजा टाकण्यात येईल, हे मान्य करून त्यांनी नाणेनिधीचं कर्ज मिळवलं. कर्जासाठी वेगवेगळ्या देशांचे त्यांचे दौरे सुरूच आहेत. अशातच नैसर्गिक आपत्ती ओढवली. आता सरकारचा खर्च वाढणार, ही इम्रान खान यांची प्रमुख चिंता असणं स्वाभाविक आहे.

बिचारा रिपोर्टर! उपलब्ध निधीतला जास्तीत जास्त वाटा पूरग्रस्तांना मिळावा, यासाठी त्याला मोठं दिव्य करावं लागलं. सोशल मीडियावर मात्र तो टिंगलीचा विषय ठरला. “आत्महत्येच्या घटनेचं रिपोर्टिंग कसं करणार,’ असा खवचट प्रश्‍न कुणी विचारला, तर कुणी तो गुडघ्यावर बसला असावा, अशी शंका काढली. काही गोष्टी इतक्‍या बदनाम झाल्यात की सांगणारा आणि ऐकणारा दोघेही गंभीर नसतात. रिपोर्टिंगसाठी आटापिटा करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकारांना कराचीत दाऊद दिसेल, तो सुदिन!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.