“कडकनाथ’च राजकारण अन्‌ शेतकऱ्यांचं मरण

जिल्ह्यात 1.42 कोटींपेक्षा जादा घोटाळ्याची शक्‍यता 

उमेश सुतार/कराड: अठरा विश्‍व दारिद्य्राने पिचलेला, तोट्यात शेती करुन गोत्यात आलेला शेतकरी आपली परिस्थिती सुधारावी म्हणून जोडधंदा करतो. अशातच त्याला कुणी तरी येवून सेंद्रीय शेती करा, झिरो बजेट शेती करा, शहामृग पाळा, सागवान लागवड करा, गिर गाई पाळा आणि श्रीमंत व्हा, अशी स्वप्ने दाखवतो. यामध्ये शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, पण स्वप्ने दाखवणारे मात्र अति श्रीमंत झाले. त्यासंदर्भातील कृषिविषयक कार्यक्रमामुळे शेतकरी अशा आमिषाला बळी पडले. गेल्या महिनाभरात असेच एक कडकनाथ कोंबडी प्रकरण उघडकीस आले आणि शेतकऱ्याचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात या कंपनीने अनेक जणांना गंडा घातला असून सुमारे 1 कोटी 42 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळ्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कडकनाथ कोंबडी पाळा व श्रीमंत व्हा, अशी जाहिरात करुन एका खासगी कंपनीने शेतकऱ्यांना आशा दाखवली. कडकनाथ पक्षी पाळल्यास आपण आपली परिस्थिती सुधारु अशी आशा लागल्याने शेतकऱ्यांनीही मोठ्या आशेने या कंपनीत लाखो रुपये गुंतवून पक्षी खरेदी केले. काही वर्षे या व्यवसायात काही शेतकऱ्यांना फायदा झाल्याने हजारो शेतकरी या कंपनीत पैसे गुंतवून कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय करु लागले. प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो, त्याप्रमाणे याही कंपनीचे झाले.

शेतकऱ्यांना दाखवलेली खोटी स्वप्ने प्रत्यक्षात आणताना कंपनी सुरु करणारांनी दाखवलेला भपकेबाजपणा अक्षरशः फोल ठरला आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसल्याने शेतकरी याचा जाब कंपनीच्या संचालकांना विचारु लागले. रोज शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढू लागल्या, शेतकरी भरलेले पैसे परत मागू लागले असून पैसे परत घेण्यासाठी कंपनीपुढे गर्दी करु लागले आहेत.

शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक पाहून काही संघटना पुढे सरसावल्या असून या कंपनीवर गुन्हे दाखल करा, म्हणत आंदोलनाच्या आडून राजकीय उद्देशही सफल करु लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेतकरीही आता आपले पैसे मिळणार, या आशेने अशा संघटनेकडून आशा धरून बसले आहेत. पण ही आंदोलने खरच शेतकऱ्यांसाठी होत आहेत का? असाही प्रश्‍न आता उपस्थित होवू लागला आहे. संबंधित कंपनी व एका संघटनेच्या नावातील साधर्म्याचा फायदा घेवून ही लोक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा दुसऱ्या संघटनेला बदनाम करुन राजकारण करण्यात जास्त व्यस्त राहिली आहेत की काय? असा प्रश्‍न या प्रकरणाने निर्माण झाला आहे. कडकनाथचं राजकारण पेटल्याने दुसरी संघटना ही आक्रमक झाली आणि शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या कंपनीची सीआयडी चौकशी करावी व कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करु लागली.

अखेरीस पोलीस प्रशासनाने दोन्ही संघटनेच्या मागणीनुसार कंपनीच्या संचालकावर गुन्हे दाखल करुन त्यांची बॅंक खाती गोठवली व काही संचालकांना अटक केली. मात्र आता पुढे काय? हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या सर्व प्रकारामुळे तुमच झाल राजकारण आणि आमचं आलंय मरण अशीच म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यावर येवून ठेपली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)