66 जणांना पावणेदोन कोटींचा गंडा
महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून फसवणूक
पुणे – कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याचे लोण पुणे शहरातही पसरले आहे. कमी पैशात दुप्पट उत्पन्न अशी जाहिरात करून महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शहरातील 66 जणांना 1 कोटी 73 लाखांचा 19 हजारांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात एकाने फिर्याद दिली असून कंपनीच्या रोखपालला अटक केली आहे.
प्रितम माने असे अटक केलेल्या रोखपालाचे नाव आहे. तर कंपनीचे अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा. इस्लामपूर, सांगली) यांच्यासह हनुमंत शंकर जगदाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी निलेश शिवाजी आंबेडे (रा. दत्तवाडी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी पैशांची गुंतवणूक करून दुप्पट उत्पन्न अशी महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने कडकनाथ कोंबडी पालनाची जाहिरात केली होती. त्यानुसार नागरिकांनी कंपनीत गुंतवणूक केली. त्यामध्ये आंबेडे यांनी कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायासाठी संबंधित कंपनीकडे 2 लाख 50 हजारांची गुंतवणूक केली. कंपनीच्यावतीने त्यांना 300 कडकनाथ कोंबडी पक्ष्यांचे वितरण करून त्यांचे खाद्य, लस, भांडी, डॉक्टर भेट, व्यवस्थापनाचा समावेश होता. मात्र, पैसे जमा करूनही महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आंबेडे यांना कडकनाथ कोंबडी पालनासाठी पिल्ले न देता फसवणूक केली. तसेच इतर 66 नागरिकांनी कडकनाथ कोंबडी पालनात फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित कंपनीविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे अधिक तपास करीत आहेत.
एका न्यूज चॅनेलद्वारे प्रकल्पाची जाहिरातबाजी
आरोपींनी एका प्रसिद्ध न्यूज चॅनेलवर कडकनाथ प्रकल्पाची जाहिरातबाजी केली होती. तसेच एक कार्यक्रम दाखवून त्याद्वारे गुंतवणूक केल्यास किती फायदा होईल, याची माहिती दिली होती. कंपनीचे मुख्य कार्यालय सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आहे. तर पुण्यात सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड सिनेमासमोरील लॅंडमार्क सेंटर इमारतीत शाखा आहे. येथे नागरिकांना वेगवेगळे प्लॅन सांगण्यात येत होते. तसेच पहिल्या 6 महिन्यांत 12 हजार अंडी प्रति 60 रुपये दराने तसेच 3 महिन्यांनंतर मोठी झालेली पिल्ले 300 रुपयांनी विकत घेणार असे सांगण्यात येत होते. हे कार्यालय ऑगस्ट 2019 मध्ये बंद करून आरोपींनी पळ काढला आहे.