अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये 3 जोरदार स्फोट झाले आहेत. या भीषण स्फोटांमुळे 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे स्फोट पश्चिम काबूलमध्ये झाले आहेत. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पहिला स्फोट मुमताज शाळेत झाला. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इतर स्फोट सुद्धा अन्य् शाळेजवळच झाले आहेत. राजधानी काबूल पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम काबूलमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये 20 ते 25 लोके जखमी झाले आहेत. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या स्फोटानंतर बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, तालिबान अफगाणिस्तानात शिरल्यापासून इस्लामिक स्टेट सक्रिय झाले आहे. दहशतवादी संघटना देशातील शिया लोकसंख्येला लक्ष्य करत आहे. शिया मुस्लिमांच्या मशिदींवर हल्ले केले जात आहेत. यापूर्वी एप्रिलच्या सुरुवातीला काबूलमधील सर्वात मोठ्या मशिदीत दुपारच्या नमाजाच्या वेळी हातबॉम्बचा स्फोट होऊन किमान सहा जण जखमी झाले होते.