दुबई : निवारी जाहीर झालेल्या आयसीसी टी-20 खेळाडूंच्या क्रमवारीत फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा सलामीवीर के. एल. राहुलने सहावे स्थान कायम राखले तर कर्णधार विराट कोहली ने नवव्या स्थानावर झेप घेतली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेच्या समारोपानंतर आयसीसी टी-20 क्रमवारीत सुधारणा करण्यात आली. कोहलीच्या संघाने ही मालिका 2-0 ने जिंकली.
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये 45 आणि 54 धावा काढून ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनंतर फक्त सहा गुणांनी मागे असलेल्या राहुलने सर्वाधिक 26 गुणांची कमाई केली असून तो 760 रेटिंग गुणांवर आला आहे.
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये अव्वल क्रमांकावर असलेला विराट कोहली नवव्या स्थानावर आहे; तर डावखुरा सलामीवीर शिखर धवनही 15 व्या स्थानावर आहे.
मनीष पांडेनेही चार स्थानांची प्रगती केली असून तो 70 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांनी वर्षाच्या पहिल्या टी-20 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली असून या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये व्हावयाच्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.
भारत-श्रीलंकेदरम्यान झालेल्या मालिकेचा मालिकावीर नवदीप सैनीने 146 वरून 98 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे तर शार्दुल ठाकूरने 92 व्या स्थानावर पुनरागमन केले आहे. जसप्रीत बुमराहने आठ स्थानांची कमाई करत 39 व्या स्थानावर झेप घेतली आहे.