के. के. रेंजच्या रणांगणात युद्ध सरावाचा थरार

नगर  – के.के. रेंजच्या 36 हजार एकर विस्तीर्ण भूभागावर रणगाड्यांच्या सहाय्याने क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करत लक्ष्यभेद करून भारतीय सैनिकांनी शत्रूच्या मनात धडकी भरवणारा युद्ध सराव करत उपस्थितांची मने जिंकली… प्रसंग होता रणगाड्यांच्या सहाय्याने युद्धक्षेत्रात आपले प्राबल्य सिद्ध करण्यासाठी युद्धसराव प्रात्यक्षिकांचा.

आज झालेल्या युद्धसरावात टी-90 भीष्म , टी-72 अजेय , एम.बी.टी अर्जुन ,बी.एम.पी रणगडे आणि अन्य चिलखती वाहनांसह चेतक ,ध्रुव या हेलिकॉप्टरसनी सहभाग घेतला. सर्वप्रथम टी-90 रणगाड्यातून लांब पल्ल्‌याची क्षेपणास्त्रे डागून 3-4 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांचा अचूक लक्षभेद केला. त्यानंतर बी.एम.पी. रणगाड्यातून छोटा तोफांच्या सहाय्याने कमी अंतरावरील लक्षांचा अचूक भेद केला. तसेच हवेतून होणारा आक्रमणाचाही यशस्वी प्रतिकार करत आपल्या अचूक माऱ्याच्या क्षमतेचे प्रदर्शन केले .युद्ध सरावाच्या दुसऱ्या भागात वरील सर्व रणगाड्यांच्या मारक क्षमतेचे तांत्रिक परिचय करून देण्यात आला तसेच चिलखती वाहनांचेही प्रदर्शन करण्यात आले.

प्रत्यक्ष युद्ध सरावात शत्रूने चढाई केल्यानंतर संरक्षण दलाच्या गुप्त कॅमेऱ्यांनी हेरगिरी करून शत्रूच्या व्यूहरचनेचा अभ्यास करून त्यांच्यावर चढाई करून शत्रूवर ताबा कसा मिळवायचा याची प्रत्यक्ष कारवाई आणि रणगाड्यांना हवाई संरक्षण हेलिकॉप्टरसच्या माध्यमातून त्यांना संरक्षण कसे दिले जाते याची प्रात्यक्षिक दाखविताच शत्रूची ठाणी काबीज करून त्यांच्यावर प्रत्यक्ष विजय कसा मिळवला जातो हे सगळं दाखवताना उपस्थितांचा उर अभिमानाने भरून आला. एवढ्यात भारत माता कि जय असं म्हणत एका जवानाने तिरंगा फडकवल्यावर उपस्थितांनी त्याला उत्स्फूर्तपणे टाळ्यांनी दाद दिली.

शंभर वर्षानंतर आजही युद्ध तंत्रातील रणगाड्यांचे महत्त्व कमी झालेलं नाही किंबहुना पूर्वांचल सारख्या भौगोलिक स्थिती असलेल्या प्रदेशात युद्ध करताना रणगाडेच जास्त उपयुक्त ठरतात असे मत मेजर जनरल एस.झा यांनी सांगतानाच आपल्या सारखीच भेदक क्षमतेची प्रक्षेपणास्त्र पाकिस्तानकडे आहेत काय असे विचारल्यानंतर झा यांनी हो असे उत्तर देत मात्र आपल्याकडील तोफांच्या सहाय्याने अचूक मारा करण्याचे प्रशिक्षण पाकिस्तानकडे नाही असे उत्तर मेजर जनरल एस.झा यांनी दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.