भोपाळ: मध्य प्रदेशातील भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आज अकरा दिवसांनी तेथील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे. त्यात ज्योतिरादित्य शिंदे समर्थकांना महत्त्वाची खाती मिळाली आहेत.
गेल्या 2 जुलै रोजी एकूण 28 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून त्यातील 20 कॅबिनेट दर्जाचे तर आठ राज्यमंत्री आहेत. शिंदे यांचे समर्थक तुलसी सिलवट यांना त्यांचे पूर्वीचेच जलस्रोत मंत्रालय देण्यात आले असून त्या
खेरीज त्यांच्याकडे मत्स्य उद्योग खातेही देण्यात आले आहे. गोविंदसिंह रजपूत यांच्याकडील महसूल आणि परिवहन ही खाती कायम ठेवण्यात आली आहेत.
शिंदे यांचे आणखी एक समर्थक डॉ. प्रभुराम चौधरी यांना आरोग्य व कुटुंब कल्याण ही खाती देण्यात आली आहेत. प्रद्युम्नसिंह तोमर यांना ऊर्जा, महेंद्र सिसोदिया यांना पंचायतराज, इम्रती देवी यांना महिला व बालकल्याण, ही खाती देण्यात आली आहेत. सामान्य प्रशासन, सार्वजनिक संपर्क, नर्मदा खोरे विकास, विमान वाहतूक, अशी महत्त्वाची खाती मुख्यमंत्री चौहान यांच्याकडेच राहणार आहेत.