न्या. पिनाकी चंद्र घोष होणार देशाचे पहिले लोकपाल 

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश पिनाकी चंद्र घोष यांची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्‍यता आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांच्या निवडीला मान्यता दिली असल्याचे सांगण्यात येते पण त्यांच्या नावाचा अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. घोष हे मे 2017 रोजीच सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले आहेत.

या निवड प्रक्रियेविषयी क्रॉंगेसकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे कारण या निवड समितीच्या बैठकीला कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे हे उपस्थित नव्हते. सरकारने आपली या समितीवर केवळ विशेष निमंत्रीत म्हणून नियुक्त केली आहे ती आपल्याला मान्य नाही. विशेष निमंत्रीताला या बैठकीत कोणताही अधिकार नव्हता त्यामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहणार नाही असे खरगे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सन 2013 सालीच लोकपाल कायदा संमत केला आहे. पण मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात लोकपालाची नियुक्ती न केल्याने हा विषय सध्या सुप्रिम कोर्टात गेला आहे. सुप्रिम कोर्टाने या बाबतीत सरकारला लोकपाल नियुक्तीत झालेल्या दिरंगाई बद्दल फटकारले आहे. पंतप्रधानांसह सर्वच पातळीवरील भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचा अधिकार लोकपालांच्या यंत्रणेला असणार आहे.

हजारेंनी केले स्वागत 
लोकपाल नियुक्तीच्या निर्णयाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वागत केले आहे. देशात लोकपालाच्या नियुक्तीसाठी गेली 48 वर्ष लढा सुरू होता या लढ्याचा अखेर विजय झाला आहे असे ते म्हणाले. लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी देशात अनेक वेळा आंदोलने केली आहेत. त्यांचे रामलिला मैदानावरील उपोषण आंदोलन या प्रकरणात निर्णायक ठरले. याच मागणीसाठी त्यांनी अलिकडेच राळेगणसिद्धी येथे त्यांच्या गावी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीने त्यांचे हे उपोषण मागे घेण्यात आले होते. न्या पिनाकी चंद्र घोष यांच्या नियुक्तीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.