माण मतदारसंघातून संदीप मांडवेंना उमेदवारी; पवारांची खेळी यशस्वी
सातारा, दि. 4 (प्रतिनिधी)
जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत असणारा मतदार संघ म्हणजे माण, याच माण मतदार संघातून वेगवेगळ्या पक्ष आघाड्यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब होण्यावरून मोठा घोळ सुरू होता.
या सगळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी सभापती संदीप मांडवे यांच्या रुपाने खटाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या पोराला न्याय देत उमेदवारीची माळ मांडवे यांच्या गळ्यात घातली. या सगळ्यात राजकारणात स्वाभिमानीचे प्रदेश प्रवक्ते अनिल पवार यांची खेळी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
संदीप मांडवे यांनी गेली दोन वर्षे विधानसभा लढायची ठरवत कामाला सुरूवात केली होती. त्यांनी मतदार संघातील गावागावात कामाला सुरूवात केली केली होती. मात्र, बदलत्या राजकारणात माण मतदार संघातून “आमचं ठरलंय’ हा पॅटर्न पुढे आला अन् या पॅटर्नच्या खेळात मांडवे यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती.
मात्र, तसे झाले नसल्याने त्यांनी मी लढणारच असे सांगत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीला सुरूवात केली. अशात स्वाभिमानीचे प्रदेश प्रवक्ते अनिल पवार यांनी मोठी खेळी करून हा मतदार संघ राष्ट्रवादीकडून स्वाभिमानीकडे खेचला अन् संदीप मांडवेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने खटाव तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला गेला.
मांडवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भुमिका व्यक्त करताना म्हणाले, माजी आमदार गोरेंच्याविरोधात लढण्यासाठी आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते जिवाचे रान करू. शेतकऱ्यांना न्याय देण्यासोबतच त्यांच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून विधानसभेत आवाज उठवणार आहे.