फक्त प्रतीक्षा! स्वॅब रिपोर्टसाठी तीन दिवस ‘वेटिंग’

करोनाचे गंभीर रुग्ण वाढण्याची भीती : अहवालाशिवाय बेडही मिळेना

पुणे – करोनाचे गंभीर रुग्ण वाढत आहेत. त्यात रुग्णांचा शासकीय चाचणी केंद्रावरील अहवाल येण्यास दोन ते तीन दिवस लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे अहवाल येण्यापूर्वी करोना झाला आहे का नाही, हे तपासणीसाठी नागरिक सीटी स्कॅन करण्यावर भर देत आहेत. त्यात करोना विषाणू फुफ्फुस निकामी करत असल्याचे दिसले, तरी चाचणी अहवाल असल्याशिवाय अनेक रुग्णालये बेडच रुग्णास देत नसल्याने अनेक रुग्ण अचानक गंभीर होत आहे. परिणामी, अशा रुग्णांना अहवाल येण्याची वाट पाहत उपचाराविनाच राहावे लागत आहे.

शहरात गेल्या आठवड्यापासून नवीन बाधितांचा आकडा घटत असला, तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण अचानक वाढले. मार्च अखेरपासून शहरात करोना चाचण्यांचे प्रमाण दिवसाला 20 हजारांवर गेले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी दिवसाला तब्बल सरासरी 25 हजारांच्या पुढे करोना चाचण्या झालेल्या आहेत. त्यातच, रुग्णसंख्या कमी होत असली, तरी लक्षणे दिसताच अनेक जण भीतीपोटी तातडीने चाचणी केंद्र गाठत आहेत. मात्र, महापालिकेकडून दिवसाला केवळ 2 हजार ते 2500 चाचण्या केल्या जात असून उर्वरित चाचण्या खासगी लॅबमध्ये केल्या जात आहेत. त्यात, आता अनेक खासगी लॅबचे अहवाल 24 तासात येत असले तरी शासकीय केंद्रावरील चाचण्यांचे अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे या कालावधीत रुग्ण अहवालाची वाट बघत असून अनेकांना अचानक ऑक्‍सिजनची गरज भासत आहे. अशा वेळी हे रुग्ण डॉक्‍टरांच्या सल्ला घेऊन सीटी स्कॅन करून घेत आहेत. मात्र, त्यानंतरही त्यांना अहवालाची वाट पाहावी लागत आहे.

अहवाल नाही, तर बेडही नाही
रुग्णांकडे करोनाची बाधा झाल्याचा अहवाल असेल, तरच बेड मिळेल असे शासकीय आणि प्रमुख खासगी रुग्णालये सांगत आहेत. अहवाल नसेल आणि कितीही त्रास होत असेल, तर रुग्णांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे अहवाल येईपर्यंत रुग्णांकडून घराजवळील डॉक्‍टरांच्या सल्ला घेऊन औषधे घेतली जात आहेत. तर अनेक जणांना अहवाल येईपर्यंतच करोनाच्या गंभीर स्वरूपाचा सामना करावा लागत आहे. बेड मिळविण्यासाठी अहवालाची वाट पाहत जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठीही तातडीने बेड मिळावा, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.