‘मी मुख्यमंत्री’ हे सांगण्यासाठीच…

राजगुरूनगर – भाजपची महाधनादेशावर महाजनादेश यात्रा व शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा ही नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निघालेली नाही, तर “मुख्यमंत्री मीच होणार’ हे सांगण्यासाठी निघालेली आहे. शिवसेनेच्या युवराजांची जनआशीर्वाद यात्रा निघाली आहे; पण या वयात ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायाचे असतात, असा सल्ला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे यांनी देत भाजप-शिवसेनेच्या नेत्यांवर बोचरी टीका केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवसुराज्य यात्रेनिमिताने राजगुरूनगर येथे मुंडे बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री फौजिया खान, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार दिलीप मोहिते, विलास लांडे, राम कांडगे, पोपटराव गावडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली गोरे-चाकणकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, निर्मला पानसरे, अरुण चांभारे, रामदास ठाकूर, बाळशेठ ठाकूर, कैलास सांडभोर, संध्या जाधव यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, सल्लागार नेमून राजकारण करण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. प्रशांत किशोर यांना सल्लागार ठेवले आहे. या सल्लागाराने शिवसेनेला सांगितले की, खेडची शिवसेनेची जागा पुढच्यावेळी येत नाही. त्यावेळी दिलीप मोहिते पाटील यांच्या मागे लागण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून होऊ लागले. राज्याचे गृहमंत्र्यांनी पुढाकार घेतला व मोहितेंना अटक झाली पाहिजे, त्यांना अटक झाली तर राष्ट्रवादीचा कणा मोडला जाईल; मात्र न्याय व्यवस्थेत त्यांना न्याय मिळाला आहे. आम्ही 10 वर्षे सत्तेचे राजकारण केले. मात्र विरोधकांना कधीही कोणत्या प्रकरणात अडकवले नाही. राज्यात आम्ही शिवसुराज्य यात्रा घेवून आलो आहे. जनतेला आशेचा किरण दाखवून त्याप्रमाणे काम करण्यासाठी आम्ही या यात्रेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अजित पवार, डॉ. अमोल कोल्हे यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील थिगळे तर कैलास लिंभोरे यांनी आभार मानले.

शरद पवार नसते तर मी जेलमध्ये गेलो असतो. खेड तालुक्‍यात घाणेरडे राजकारण केले जात आहे. अशा राजकारणाला मूठमाती दिली पाहिजे. तालुक्‍यात जातीपातीचे राजकारण सुरु झाले आहे हे राजकारण जनता जवळून पाहत आहे ती दुधखुळी नाही आगामी निवडणुकीत त्यांची जागा नक्‍की दाखवेल.
– दिलीप मोहिते, माजी आमदार.

Leave A Reply

Your email address will not be published.