क्‍लिक करण्याआधी करू थोडा विचार!

जग किती जवळ आल्यासारखं वाटतंना हल्ली या फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपमुळे. अगदी परदेशात असलेली व्यक्‍तीसुद्धा आपल्याशी जवळ बसून गप्पा मारतीये असं वाटत. गुगलमुळे सगळे प्रश्‍न अगदी सुटल्या सारखे वाटतात नाही का? काही अडलं की गुगलवर शोधणं हे अगदी लहान मुलांना देखील जमतं आणि या सगळ्यांनी असं वातावरण तयार झालय की हळूहळू आरोग्याचे प्रश्‍नदेखील हा गुगल आणि फेसबुक सोडवेल एका क्‍लिकमध्ये असं वाटतंय!

त्यात वजन कमी करणे या प्रश्‍नाचे उत्तर पण नेट/वायफाय पद्धतीने सोडवायचे प्रयोग स्वतःच्या शरीरावर सहज लोक करताना दिसतात! याने सांगितलं, त्याने सांगितलं, अमक्‍या साईटवर पाहिलं अशा पद्धतीने माहिती गोळा करून आरोग्याचे प्रश्‍न लोक परस्पर कोणताही विचार न करता आपापला सोडवू पाहत आहेत. उदा. झटकन वजन कमी करण्यासाठी अनेक डाएट उपलब्ध असतात, आणि त्यात आज फक्‍त दिवसभर टोमॅटो खाणे असं सांगितलेले असते. पण जी व्यक्‍ती हे करू पाहतीये तिला जर पित्ताचा त्रास असेल तर हे अति टोमॅटो खाऊन त्या व्यक्‍तीला फक्‍त उलट्या होऊ शकतात. त्यातही महिनाभरात 10 किलो वजन कमी करणे हा भयंकर प्रकार करण्यासाठी लोक काहीपण प्रयत्न करत असतात तेही अंधपणाने. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका महिन्यात 2.5 किलो पेक्षा जास्त वजन कमी करू नये असं आरोग्यशास्त्र देखील सांगते. शिवाय नेटवर उपलब्ध असलेले सर्वच पर्याय आपल्या शरीराला लागू पडतात का? याची शहानिशा न करता आपण हे करत असतो. याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर काय होईल हे आपल्याला कळत नाही. किंबहुना त्याचा विचारच केला जात नाही.

वजन कमी करतानासुद्धा प्रकृती परीक्षण करून त्या प्रकृतीला काय योग्य असू शकेल हा विचार करून, फक्‍त त्या व्यक्‍तीला लागू पडेल असं डाएट प्लान आहारतज्ज्ञ बनवत असतात. त्यातही त्या व्यक्‍तीला जर एखाद्या गोष्टीची कमतरता असेल उदा, त्याचे हिमोग्लोबिन कमी असेल तर वजन कमी करताना ते हिमोग्लोबिन कसं वाढेल याची काळजी घेऊन आहार ठरवला जातो. एखाद्या व्यक्‍तीला हार्मोनल काही त्रास असेल उदा. थायरॉईड, तर तो कसा कमी करता येईल याचा विचार करून त्या व्यक्‍तीला आहार सुचवला जातो. याचा अर्थ आपल्या आहारात बदल करण्या आधी देखील आपली मेडीकल हिस्ट्री तपासून त्याप्रमाणे बदल करायचे असतात. कारण खरं तर आहार हे एक औषधच आहे. पण हल्ली वजनासंदर्भात लोक कोणताही प्रयोग करतात. अहो, आपण भाजी घेताना देखील अगदी निवडून घेतो, चांगल्या ठिकाणी जाऊन उत्तम भाजी घेतो. चांगले कपडे घेण्यासाठी अगदी गर्दी मध्ये लांब जायला लागलं तरी, वेळ लागला तरी निट पाहून सर्व घेतो. मग आपल्या स्वतःच्या शरीरावर प्रयोग करताना 1 मिनिट देखील आपण, मागचा पुढचा कोणताच विचार कसा काय करत नाही? शरीरावर कोणताही खाण्यापिण्याचा औषधांचा उपयोग करण्या आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत जरुरी आहे. एक स्त्री म्हणून तर आपण आपल्या शरीराचा निट सांभाळ केला पाहिजे. कोणताही विचार न करता आपण आपल्या शरीरावर प्रयोग केला तर मासिक पाळीला त्रास होणे, थायरॉईड होणे, अति वजन वाढणे, अशक्‍तपणा, डोळ्याखाली काळे वर्तृळ येणे असे प्रकार घडतात.

होतं अस की आपण अंधपणाने कोणत्या तरी ठिकाणाहून मिळालेल्या आहार तक्‍त्यांचा उपयोग करून बरेच महिने खाणे पिणे बदलतो. सुरुवातीचे काही दिवस बरं वाटत असेलही, पण नंतर अशक्‍तपणा, निस्तेज त्वचा, केस गळणे इत्यादी अनंत तक्रारी सुरू होतात. काही दिवसांनी उत्साह संपला की पहिल्या प्रमाणे जेव्हा खाणे सुरू होते तेव्हा दुपटीने वजन वाढायला सुरुवात होते. पूर्वी जेवढी पचवण्याची ताकद असते पोटाची ती देखील कमी होते. पूर्वी सहज पचणारे घरातले अन्न देखील त्रास देऊ लागते आणि शरीराचे सगळे चक्र बिघडून जाते. या सर्वात असं झालेले असते की आपण जेव्हा त्या डाएट वर असतो तेव्हा आपले कॅल्शियम, प्रथिने आणि इतर सर्व विटामिन आणि महत्त्वाचे घटक कमी होतात आणि त्याचे दुष्परिणाम नंतर शरीरावर दिसू लागतात.

योग्य पद्धतीने केले तर वजन कमी करताना आपली चरबी कमी झाली पाहिजे. तेच जर शरीरातील पाणी, स्नायू, हाडांची घनता कमी होऊन वजन कमी होत असेल तर त्याचा काय उपयोग? मग असं कुठून पण मिळालेल्या माहिती वरून केलेल्या डाएटमुळे नेमकं काय कमी झालं आहे ते आपल्याला समजतच नाही. आम्ही आमच्या क्‍लिनिक मध्ये त्या व्यक्‍तीची चाचणी घेत असतो त्याला बॉडी ऍनालिसीस म्हणतो, ज्यामुळे दिलेले आहार पालन केल्यानंतर नेमकं काय कमी झाले आहे व काय वाढले आहे ते समजते. चरबी कमी होऊन स्नायू वाढलेले असतील तर उत्तम. या पद्धतीने कमी केलेले वजन पुन्हा वाढत नाही, जरी भरपूर आणि वेगळ खाण खाल्लं तरी. वजन अशा मार्गाने कमी केल्यानंतर हाडांची घनता वाढलेली असते, स्नायू वाढलेले असतात, उत्साह वाढलेला असतो, पचनसंस्था सुधारलेली असते, त्वचा सुधारते, मासिक पाळीचे चक्र सुधारते, हार्मोनल त्रास कमी झालेला असतो, आणि वजन देखील कमी होऊन हलकेपणा येतो. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घ्या, मगच आपल्या शरीरावर प्रयोग करा.

– श्रृती देशपांडे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)