महापौरपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

एका जागेसाठी 98 दावेदार : भाजप पक्षाची होणार कसरत


पदासाठीची निवडणूक येत्या 22 नोव्हेंबरला होण्याची शक्‍यता


महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवड होण्याची शक्‍यता

पुणे -महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीत अनपेक्षितरित्या पुणे शहरासाठी पुढील अडीच वर्षे महापौरपद खुल्या सर्वसाधारण वर्गाची लॉटरी निघाली आहे. त्यामुळे महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपमध्ये महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट असून एका पदासाठी तब्बल 98 जण इच्छुक असणार आहेत. त्यामुळे महापौरपदाचा उमेदवार निवडताना भाजपला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, या पदासाठीची निवडणूक महापालिकेत येत्या 22 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

पुण्यासह राज्यातील 27 महापालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबईत काढण्यात आली. त्यात पुणे महापालिका महापौरपदासाठी खुल्या सर्वसाधारण वर्गाचे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपमधून महापौरपदासाठी कोणत्याही प्रवर्गातील नगरसेवकांची संधी मिळू शकणार आहे. पालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून तब्बल 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे आरक्षण जाहीर होताच, अनेक इच्छुकांनी तातडीने महापालिका गाठली, तर अनेकांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या दालनात बसून आरक्षणाचा आणि त्यावर सुरू असलेल्या चर्चेचा कानोसा घेतला. तर अनेक इच्छूक कार्यकर्त्यांसह गर्दीकरून महापालिकेत आल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान, राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तास्थापनेत अपयश आले असून राज्यात शिवसेना आणि आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी तसेच पक्षाला आणखीन बळ देण्यासाठी पक्षाकडून अनुभवी नगरसेवकालाच संधी दिली जाणार असल्याचे चित्र आहे.

यांच्या नावांची आहे चर्चा…
या शर्यतील प्रामुख्याने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचे नाव महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर राहणार असल्याचे स्पष्ट आहे. विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीची जोरदार तयारी केलेल्या मोहोळ यांना प्रदेशाध्यक्षांच्या उमेदवारीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे त्यांची हुकलेली संधी महापौरपदाच्या माध्यमातून दिली जाईल, अशी चर्चा आहे. याशिवाय अन्य इच्छुकांमध्ये नगरसेवक हेंमत रासने, श्रीनाथ भीमाले, वर्षा तापकीर, श्रीकांत जगताप, धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर, मंजुषा नागपूरे यांची नावेही चर्चेत असून इतर पक्षांतून महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये आलेले अनेक ज्येष्ठ नगरसेवकही या शर्यतीत असणार असल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.