सावधगिरी बाळगा; महावितरणचे सतर्कतेचे व सुरक्षिततेचे आवाहन
नगर – मकरसंक्रांतीनिमित्य पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज यंत्रणा पासून सावधगिरी बाळगावी व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत.
पतंग आणि मांजा विक्रीचे दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगीबेरंगी पतंगांची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येवू नये याकरिता महावितरणने सर्व संक्रांतप्रेमींना पतंग उडविताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात वीज वितरणच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते.
अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात. अशावेळी ते अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी सलाखी, किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होवून जीवावर बेतू शकते त्यामुळे असे प्रयत्न करू नये. अनेकदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेचा भीषण अपघात होऊ शकतो.
मांजा ओढताना एका तारेवर दुस-या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्किटमुळे प्राणांकीत अपघात होवून त्यामुळे वीजपुरवठा खंडित होवू शकतो. प्रामुख्याने शहरासह ग्रामीण भागातही वीज यंत्रणा अस्तिवात आहेत. वीज वाहिन्यांच्या परीसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवितात. अनेक पतंग या विजवाहिन्यामध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात व यावेळी पतंग काढताना अनेकवेळा अपघात घडतात.
बाजारामध्ये धातुमिश्रित मांजा मिळतो या मांजावर धातुमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो. असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये विघाड होऊन संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो व त्याचबरोबर अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.नागरिक व लहान मुलांनी वीज वाहिन्या,वीज यंत्रणा असलेल्या परिसराएवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा.