जुन्नरच्या लोकप्रतिनिधींच्या महाघोटाळ्याचा आज पोलखोल

अतुल बेनके : ओतूर येथे अजित पवार घेणार जाहीर सभा

जुन्नर – विद्यमान लोकप्रतिनिधींनी महाघोटाळा केला असून याची पोलखोल बुधवारी (दि. 16) ओतूर येथे होणाऱ्या अजित पवार यांच्या जाहीर सभेत करणार आहोत, असा इशारा अतुल बेनके यांनी दिला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा घोटाळा काय असणार याकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांनी काले येथे मतदारांशी संवाद साधताना वरील इशारा दिला आहे. याप्रसंगी दशरथ पवार, बाजीराव ढोले, अनिल पारखे, संतोष घोगरे, गणेशी वाजगे, माजी नगरसेविका वैष्णवी चतूर, प्रयाग पानसरे, विलास पानसरे, मंजुषाताई पानसरे आदी उपस्थित होते. अतुल बेनके म्हणाले की, जनतेचा फंड वापरून स्वतःच्या खिशातील फंड सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनतेने ओळखले आहे.

बुधवारी अनेक तरूण शिवसेनासोडून या सभेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. या तरूणांचे प्रवेश करण्याचे कारण म्हणजेच तेथील लोकप्रतिनिधींवर विश्‍वास राहिलेला नसल्याने तसेच बहुरूपी व सोंगाड्या लोकप्रतिनिधी नको म्हणून तरूण वर्ग राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून शाश्‍वत विकास करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाबरोबर राहणार आहेत. वडज धरणाच्या पाण्याचे नियोजन योग्य असे केले जाईल. तांबे तलावात शेतीसाठी पाणी उपलब्ध रहावे यासाठी आपण प्रयत्नशिल राहणार असून काले, तांबे, दातखिळवाडी या भागासाठी वर्षातून पाच वेळा पाणी देण्यासाठी आपण पुढील काळात प्रयत्नशिल राहणार आहोत. वडज धरणाचे पाणी मिना नदीच्या लगत असलेल्या गावांसाठी राखीव ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. भविष्यात मिना खोऱ्यातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी देऊन पुढील काळात पाण्याचा संघर्ष होऊ देणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

मतदार बेनके यांच्या पाठीशी
माजी आमदार वल्लभ बेनके यांनी तालुक्‍यात धरणे आणून या भागाचा विकास केला आहे. मात्र विद्यमान लोकप्रतिनिधींनी याच धरणांचे पाणी खाली सोडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंडद्यावे लागले. पाच वर्षांत विकासकामांचा फक्‍त बोलबाला झाला. प्रत्यक्षात भरीव असे कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे आता मतदारांना बदल हवा असून योग्य नेतृत्व व प्रश्‍नांची जाण असलेले अतुल बेनके यांच्या पाठीशी मतदार उभे राहतील, असे मत प्रयाग पानसरे यांनी व्यक्‍त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)