जुन्नर -जुन्नर तालुक्यात करोनाबधितांची संख्या वाढत असून रविवारी (दि. 17) हा आकडा 283 वर पोहचला आहे. शनिवारी (दि. 16) रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार 26 जण पॉझिटिव्ह आढळले होते. सध्या तालुक्यात 160 नागरिक ऍक्टिव्ह असून 116 जणांनी करोनावर मात केली आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या 160 ऍक्टिव्ह रुग्णांपैकी लेण्याद्रीला असलेल्या 134 जणांना कोणतीही लक्षणे नसून उर्वरित 26 जणांवर पुणे येथे उपचार सुरू आहे.
लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये ऑनलाइन नोंदणी व स्वॅब घेण्यास उशीर होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी आमदार अतुल बेनके यांच्यासमोर मांडली. मात्र, येणाऱ्या संशयितांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केल्यावर तेथूनच नंबर अलॉट होत असतो आणि त्याप्रमाणेच तपासणी केली जात असल्याचे येथील डॉ. बनकर यांनी सांगितले. आमदार बेनके यांनी याप्रसंगी सेंटरची पाहणी करीत तेथील सोयी आणि समस्यांची माहिती घेतली.
सर्व स्तरांवर करोनाचा संसर्ग
तालुक्यातील तीन वैद्यकीय अधिकारी, जुन्नर शहरातील दोन नगरसेवक, परिचारिका, रुग्णवाहिका चालक, औषध दुकान, विविध आर्थिक व्यवहार असलेली आस्थापने, हॉटेल्स, रेशन दुकानातील व्यक्ती, चालक तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी आदी सर्वच स्तरावर करोनाने आपले साम्राज्य प्रस्थापित केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी आणि आपले कर्तव्य याचे भान बाळगणे अत्यावश्यक बनले आहे.
नियम सामान्य नागरिकांसाठीच
गेल्या महिन्याच्या अखेरीस तालुक्यात झालेला एक विवाह समारंभ गाजत आहे. त्या सोहळ्यास उपस्थितांची आकडेवारी आणि दिग्गजांची हजेरी याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यानंतर त्या कार्यालय मालकाने कार्यालय बंद असल्याचा फलक तेथे लावला आहे. तर दुसऱ्या एका शहरातील औषध विक्रेत्याकडे मोठ्या संख्येने बाधित आढळले आहेत.
त्यानंतर एका दुकानाच्या कार्यक्रमात ती राजकीय व्यक्तीदेखील करोना पॉझिटिव्ह आढळली आहे. यासोबतच अनेक व्यावसायिकांना आपल्या येथील कर्मचारी बाधित आढळल्यानंतरही व्यापाराचा मोह आवरता न आल्याचे वास्तव आहे. त्यामुळे करोनाचे नियम केवळ सामान्य नागरिकांसाठीच आहेत का, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.