बेल्हे (रामदास सांगळे) – जुन्नर तालुका हा राज्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक समृद्ध पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. जुन्नर शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून हा प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला, अष्टविनायकांपैकी ओझर, लेण्याद्री येथील गणपती, नाणेघाट, माळशेज घाट यांसह अनेक पर्यटनस्थळे देशात प्रसिद्ध आहेत.
महिन्याकाठी सरासरी 90 हजार ते 1 लाख पर्यटक आणि भाविक जुन्नरला येतात. लॉकडाऊनच्या कालावधीत दोन लाख भाविक आणि पर्यटकांनी समृद्ध तालुक्याकडे पाठ फिरविली आहे. सुमारे 200 कोटी रुपयांचा फटका दोन महिन्यांत बसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
सातवाहन काळातील जगभरातील व्यापारी कल्याण बंदरावर आपला माल घेऊन उतरत असत. मग नाणे घाटमार्गे ते घाटमाथ्यावर येऊन जुन्नरमार्गे पैठणला व्यापार करीत जात होते. कल्याण-नाणे घाट-जुन्नर-नगर-पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरील जुन्नरची बाजारपेठ तेव्हापासूनच प्रसिद्ध होती. पंधराव्या शतकापासून या तालुक्याचे महत्व अधोरेखित झाले आहे.
एप्रिल-मे महिन्यामध्ये दरवर्षी लग्नसराईनिमित्त तसेच सुट्ट्यांचा कालावधीत लाखो पर्यटक जुन्नर तालुक्यामध्ये येतात. करोनामुळे 2 महिन्यांच्या कालावधीत एकही पर्यटक आला नसल्याने व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. नुकसान होऊन लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
– यश मस्करे, पक्षी निरीक्षक व निसर्गमित्र अध्यापक, जुन्नर.
उन्हाळी सुट्टया तसेच विघ्नहर क्षेत्री देवदर्शनासाठी व सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मार्च ते जूनपर्यंत मोठी गर्दी असते. व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होते. परंतु लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय बंदच आहे. आम्हाला कामगार सांभाळणे कठीण झाले आहे. आमची आर्थिक गणिते चुकून आमचे सर्व व्यवहार कोलमडले आहेत.
– मिलिंद कवडे, हॉटेल व्यावसायिक, ओझर.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांनी (दि.21) मार्चपासून गेली 50 दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. दरवर्षी या काळात शैक्षणिक सुट्टी असते. त्यामुळे तीर्थक्षेत्री भाविकांची मोठी वर्दळ असते. दिवसाला 2 ते 3 हजार भाविक दर्शनासाठी येतात. चतुर्थीला 20 ते 25 हजार भाविक येतात. याच कालखंडात देवस्थान ट्रस्ट अनेक सामूहिक विवाह सोहळयांचे आयोजन करीत असते. देवस्थान परिसरात 50 ते 60 दुकान, 8 ते 10 हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत.
-बी.व्ही. मांडे, अध्यक्ष विघ्नहर देवस्थान ट्रस्ट,ओझर
जुन्नर तालुक्यातील सर्व कृषी पर्यटन क्षेत्रे तसेच मंदिर मार्चपासून बंद ठेवली आहेत. करोनाचे जागतिक संकट आल्यामुळे तालुक्यातील पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. आहे. पर्यटन क्षेत्राला डागडुजी करण्यासाठी निधी लागतो. हा निधी मिळण्यासाठी मार्ग राहिला नाही. जुन्नर तालुक्याच्या पर्यटन क्षेत्राला पुन्हा भरारी यावी म्हणून 17 मेपर्यंत जुन्नरच्या मातीतून या फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. यातून वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांच्या व अभ्यासकांच्या माध्यमातून पर्यटकांशी संवाद साधला जात असून यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
– मनोज हाडवळे, संस्थापक जुन्नर पर्यटन विकास संस्था,जुन्नर