नारायणगाव – जुन्नर तालुका विधानसभेच्या निवडणुकीत मागील पंचवार्षिक काळात केलेली विकास कामे बघून मतदार माझ्या पाठीशी उभे राहतील, असा दृढ विश्वास तालुक्याचे विद्यमान आमदार व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार अतुल बेनके यांनी व्यक्त केला. आज शिरोली तर्फे आळे, जाधववाडी, साकोरी परिसरात जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला त्यावेळी बोलत होते. प्रचार दौऱ्यात त्यांना ग्रामस्थांचा, तरुणांचा, वारकरी संप्रदायाचा मोठा प्रतिसाद मिळत असून मला भविष्यात काम करण्यासाठी ऊर्जा मिळत असल्याचे बेनके यांनी नमूद केले.
जुन्नर शहरात नवोदित कलाकारांसाठी काम करणारी कलोपासक संस्था आणि अंजनी उन्नती फाउंडेशनच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित राहून दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी जुन्नर शहरातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला पुन्हा एकदा शिवजन्मभूमीची सेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन उपस्थितांना केले. जुन्नर तालुक्यातील विविध विकासकामे, चिल्हेवाडी पाईपलाईन योजना, वडज उपसा सिंचन यासारखे दीर्घकालीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सुयोग्य नियोजन, शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन अशा विविध बाबींचा उल्लेख करत प्रचाराची सुरुवात केली.
“आमदार अतुल बेनके यांनी शिरोली तर्फे आळे येथे पंधरा लाखांचा निधी देऊन स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम केले आहे. गावासाठी विकासाची कामे भरपूर दिली असून काही पूर्ण झाली तर काही कामांच्या वर्क ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. आ.बेनके यांच्या कामावर गावातील लोक समाधानी असून गावच्या विकासासाठी आम्ही जेवढी कामे मागितले. तेवढी सगळी कामे मंजूर करण्यात आली. शिरोली तर्फे आळे गावासाठी सात कोटी १८ लक्ष १५ हजार रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहेत. जलजीवनच्या कामासाठी माध्यमातून चार कोटी ९६ लक्ष तर वाहतुकीसाठी मुख्य रस्ता असलेल्या कॉलनी ते कॅनॉल रस्त्याला ६० लक्ष निधी मिळाला. अभ्यासू वृत्ती, संयमी व्यक्तिमत्व,सर्वसामान्य व्यक्तीला सहजपणे भेट होते त्यासाठी पक्ष अथवा विरोधी विचार केला जात नाही. वृद्धांचा मान राखणारे आणि वारकरी संप्रदायाचा सन्मान हे त्यांचे विशेष गुण आहे. अतुल बेनके यांचा शांत स्वभाव असून बोलण्यापेक्षा जनतेचे कामे करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय असते. त्यामुळे तरुणांचे संघटन त्यांच्या पाठीशी उभे आहे.” – अभिषेक खिल्लारी. कार्यकर्ता शिरोली तर्फे आळे