Junnar Assembly Constituency | MLA Sharad Sonawane : यंदाच्या निवडणुकीत अनेक बिग फाईट्स पहायला मिळाल्या तर काही ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले आहेत. जुन्नर मतदारसंघातही असाच निकाल लागला. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदार संघ म्हणून जुन्नरकडेही पाहिले जाते. जुन्नर शिरूर लोकसभा मतदार संघात मोडणारा मतदार संघ आहे. या मतदारसंघात अन्य अनेक मतदारसंघांप्रमाणेच महायुती आणि महाआघाडी यांच्यात थेट लढत होती.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अतुल वल्लभ बेनके आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यांना माजी आमदार शरद सोनवणे, आशा बुचके या दोन अपक्ष उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडीचे देवराम लांडे यांचे आव्हान होते.
मात्र, याठिकाणी सत्यशील शेरकर किंवा अनुल बेनके नव्हे तर अपक्ष उमेदवार आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी बाजी मारली आहे. शरद सोनावणे यांना 73355 इतकी मते मिळाली आहेत. तर विद्यमान आमदार अतुल बेनके यांना 48100 इतकी मते मिळली आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्यशील शेरकर यांना 66691 इतकी मते मिळाली आहेत.
शरद सोनावणे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं महायुतीच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून ते आंदोलन करत आहेत. शिवनेरीच्या भूमिला मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी सरकारला माझी विनंती असल्याचे शरद सोनावणे म्हणाले. आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्यांनी आंदोलन केलं.
यावेळी बोलताना शरद सोनावणे म्हणाले की, “यशवंतराव चव्हाण यांनी शिवनेरीवर पहिला सुवर्ण कलश आणला होता. पहिली कॅबिनेटची बैठक देखील शिवनेरीवर झाली होती. पण शिवनेरीला मंत्रिमंडळात स्थान नाही. शिवनेरीच्या भूमिला मंत्रिमंडळात स्थान द्यावं. विधिमंडळात मी निवेदन दिलं आहे.
जुन्नर तालुक्याला स्थान द्यावं ही मागणी केल्याचे सोनावणे म्हणाले. महायुती सरकार न्याय देईल असा विश्वासा देखील शरद सोनावणे यांनी व्यक्त केला आहे. मी 25 वर्ष झालं राजकारणात आहे. अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. आता महायुतीसोबत काम करत असल्याचे सोनावणे यांनी यावेळी सांगितलं.
कोण आहेत शरद सोनवणे?
विद्यमान निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढणारे शरद सोनवणे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल वल्लभ बेनके यांनी त्यांचा पराभव केला होता.
तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शरद सोनवणे विजयी झाले होते. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते. 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर विजयी झालेले ते एकमेव उमेदवार होते.