जुन्नर (हितेंद्र गांधी) – गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या करोना लॉकडाऊनमुळे जुन्नर बाजार समितीची सुमारे 100 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. वर्षभरात 1200 कोटींची उलाढाल असलेल्या बाजार समितीमध्ये करोना बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत ओतूर, नारायणगाव व आळेफाटा येथील उपबाजारांचे कामकाज चालते. उपबाजार समित्यांचे कामकाज खोळंबले आहे.
काबाडकष्ट करून पिकविलेला शेतीमाल सडून गेल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच बाजार समितीचे उत्पन्न बुडाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या तोळामासा, अशी अवस्था झाली आहे. पिकलेला माल विकला नाही. मातीमोल बाजारभाव, सोसायट्यांच्या कर्जाचे हप्ते आणि उन्हाळ्यातील पाण्याचे नियोजन आदी अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहेत.
लॉकडाऊन कालावधीत शेतकरी कुठल्याही भावात माल विकायला तयार होत आहेत. संचारबंदी मोडल्याच्या कारणावरून पोलिसांनी काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत; मात्र या कालावधीत भाजी विकणाऱ्यांनी बक्कळ नफा कमवल्याचे चित्र आहे. या विक्रेत्यांनी शेतकऱ्यांकडून पडत्या भावात माल खरेदी करून चढ्या दरात विक्री केल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी कंगाल आणि व्यापारी मालामाल, अशी अवस्था झाली आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडल्यामुळे आगामी तीन वर्षे तरी उभारी घेणार नाही.
हमाल, वाहतूकदारांचा उदरनिर्वाह धोक्यात
जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा व ओतूर या शाखांमध्ये हजारो गाड्यांच्या मदतीने शेतीमालाची ने-आण सुरू असते. यामध्ये सर्वाधिक व परराज्यातून येणाऱ्या गाड्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये येत असतात. मात्र, या लॉकडाऊनमुळे गाड्यांवरील व हातावर पोट असणारे वाहक, हमाल, मदत करणारे मापाडी सर्वांनाच घरी बसावे लागले आहे. सध्या शेतकरी जेवढे शक्य होईल. तितकाच माल बांधावरच विकत आहेत. जुन्नर बाजार समितीमध्ये गुजरातमधून बटाट्याची किरकोळ आवक सुरू आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत जुन्नर बाजार समितीने सुमारे 15 लाख किमतीच्या किराणा साहित्याचे वाटप केले आहे. त्यामुळे 2 हजार 200 कुटुंबांना आधार मिळाला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून यंदा 100 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. बाजार समितीत कांदा, बटाटा, टोमॅटो तसेच दुभत्या जनावरांची खरेदी विक्री होत असते. या व्यवहारातून शेतकऱ्याला वेळेवर व योग्य बाजारभाव मिळत होता. आता जरी शेतीमाल खरेदी-विक्रीला परवानगी मिळाली असली तरीही बळीराजाचे मोठे नुकसान होत आहे.
– ऍड. संजय काळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नर.