जुन्नरकरांची चिंता वाढली
जुन्नर (प्रतिनिधी) – गेल्या आठवड्यात जुन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल २०१ ने वाढल्यामुळे जुन्नरकरांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊनमध्ये मिळालेली सूट, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, लपून छपुन सुरू असलेले समारंभ तसेच उत्साही नागरिकांची बेफिकिरी आदींमुळे ही वाढ झपाट्याने होत असल्याची चर्चा आहे. रविवारी (दि. २३) तालुक्यातील विविध गावांमध्ये ४१ रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी दिली.
नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी शिरोली बुद्रुकमध्ये ८ व काळवाडी येथे ४ रुग्ण आढळून आले आहेत. ओतूर, नारायणगाव, वारुळवाडी, काटेडे, आळे या गावांमध्ये प्रत्येकी ३ तर बेल्हे व जुन्नर शहरात प्रत्येकी २ रुग्ण आढळून आले आहेत. ओझर, निरगुडे, उंब्रज नं.२, आर्वी, आळेफाटा, धालेवाडी, धामणखेल, गोळेगाव, कुरण, ठिकेकरवाडी येथे प्रत्येकी १ कोरोनाबाधित आढळले आहेत.
दरम्यान, ओतूर व खानगाव येथील प्रत्येकी एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे बळींची एकूण संख्या ३४ झाली आहे. तर शनिवारी घेतलेल्या ३६ संशयितांचे रिपोर्ट्स अद्याप प्रलंबित आहेत. तालुक्यातील एकूण ७८३ बाधितांपैकी ५२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २२९ पॉझिटिव्ह रुग्णांवर लेण्याद्री, नारायणगाव व पुणे येथे उपचार सुरू आहेत.