बेल्हे – नगदवाडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी अशोक तुळशीराम बढे यांनी 3 एकर कलिंगडातून जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर लाखोंचा नफा कमविला आहे. अशोक बढे यांची नगदवाडी येथे शेती असून त्यांनी 1 फेब्रुवारीला 1 एकर ‘विराट’ जातीच्या कलिंगडाची लागवड केली.
यामध्ये त्यांना 23 टन उत्पादन मिळाले शेताच्या बांधावर 10 रुपये प्रति किलो दराने विक्री करून 70 हजार भांडवली खर्च वजा जाता त्यांना 1 लाख 60 हजारांचा निव्वळ नफा झाला तर 21 फेब्रुवारीला 2 एकर क्षेत्रात ‘मेलेडी’ जातीच्या वाणाची लागवड केली असून त्यातून 45 टन उत्पादन अपेक्षित आहे. सध्या उन्हाळ्यामुळे बाजारभावात वाढ झाली असून बांधावर व्यापारी 12 ते 14 रुपये दर मिळत असून खर्च वजा जाता त्यांना यातून 4 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
नगदवाडी येथील प्रगतशील शेतकरी कै. सदानंद बढे यांनी सर्वप्रथम या परिसरात कलिंगड लागवडीला सुरुवात केली त्यांची प्रेरणा घेऊन आज परिसरात 40 ते 50 एकर कलिंगडाची लागवड केली आहे .शेतकरी अशोक बढे यांनी कांदळी येथून रोपे खरेदी केली रोपांबरोबरच योग्य मार्गदर्शनही त्यांना तेथून मिळाले.
“यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता जास्त असल्याने व कलिंगडाची लागवड कमी असल्याने कलिंगडाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे .सध्या कलिंगडाला बांधावर 12ते 13 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत आहे या पिकास मुबलक पाणी, योग्य व्यवस्थापन लागते परंतु इतर पिकापेक्षा मजुरी खर्चात बचत होते.
– अशोक बढे(कलिंगड उत्पादक शेतकरी, नगदवाडी)
कलिंगड पिकाचा कालावधी हा 2 महिन्यांचा असतो. अशोक बढे यांनी मल्चिंग पेपरवर सहा फूट अंतरावर कलिंगडाची लागवड केली आहे. लागवडीच्यावेळी शेण, कोंबडी, सेंद्रिय, विद्राव्य आदी खतांसह ठिबकचा वापर करून कलिंगडाचे भरघोस पीक घेतले आहे.
कलिंगड पिकास बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असतो. या पिकास बढे यांनी सहा ते सात बुरशीनाशक व कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या आहेत. या पिकासाठी पाण्याचे नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे असते. कलिंगडामध्ये विटामिन ए सी पोटॅशियम मॅग्नेशियम लोह अशी पोषक तत्वे आहेत.