जुन्यांचे वेतन वाढणार, नव्याने भरतीही लवकरच होणार
पुणे – महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचे वेतन वाढणार असून, ज्युनियर डॉक्टरांची पदेही भरली जाणार आहेत. स्थायी समितीने वेतनवाढ आणि नवीन भरती या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी दिली. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या महापालिकेच्या रूग्णांलयांची प्रतिमा सुधारण्यासाठी, अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टरांनी या रूग्णालयांमध्ये सेवा द्यावी यासाठी ही वेतनवाढ करण्यात आल्याचे रासने म्हणाले. याशिवाय एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांना “बंधपत्रीत वैद्यकीय अधिकारी’ पदावर नियुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात 49 बाह्यरूग्ण विभाग, 18 प्रसुतिगृह, 1 सर्वसाधारण रूग्णालय, 1 सांसर्गिक रोग रूग्णालय आणि आदी सहा सेवांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा-सुविधा पुरवल्या जातात सद्यस्थितीला येथे डॉक्टरांची कमतरता असून, कमी वेतनामुळे तज्ज्ञ डॉक्टरही महापालिकेच्या रूग्णालयाकडे पाठ फिरवत आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टरांचे वेतन प्रति महिना 52 हजार रूपयांवरून 71 हजार 697 रूपये केले आहे या निर्णयामुळे महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या 22 तज्ज्ञ डॉक्टरांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे तसेच या निर्णयामुळे आणखी तज्ज्ञ डॉक्टर महापालिकेला मिळतील अशी अपेक्षा आहे.
शहरातील महापालिकेची रूग्णालये आणि अपेक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची गरज पाहता 124 जागांवर ही नियुक्ती आवश्यक आहे सद्यस्थितीला महापालिका रूग्णालयात केवळ 22 तज्ज्ञ डॉक्टर आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या वेतन वाढीबरोबर आता महापालिकेतील रूग्णालयांमध्ये 57 एमबीबीएस डॉक्टरांची बंधपत्रीत वैद्यकीय अधिकारी (पीजीबॉण्ड) म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे विविध शासकीय महाविद्यालयामधून एमबीबीएस पदवी मिळवलेल्या उमेदवारांना यामुळे संधी मिळणार आहे या नवनियुक्त डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या निर्देशानुसार 52 हजार रूपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.