Devara Part 1 trailer | अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरचा ‘देवरा पार्ट 1’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात सैफ अली खान देखील दिसणार आहे. या तिघांच्या ‘देवरा’ या चित्रपटाची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. यापूर्वी या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज झाला होता, आता निर्मात्यांनी आणखी एक नवीन ट्रेलर रिलीज केला आहे.
अभिनेता सैफ अली खानने या सिनेमात खलनायकाची भूमिका बजावली आहे. यात समुद्रातील अॅक्शन सीन, ज्युनियर एनटीआरचा रावडी अंदाज, सैफ अली खानचा खलनायक प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला ज्युनियर एनटीआर समुद्राच्या किनाऱ्यावर दिसत आहे.
ट्रेलरमध्ये एक महिला आहे जी एनटीआरला म्हणते, “येणारे दिवस शुभ नाहीत, देवरा. ज्यांना तुम्ही स्वतःचे समजता ते तुमचे नाहीत. पुढच्याच क्षणी सैफ एनटीआरला म्हणताना दिसतो, “जर तुम्हाला समुद्रावर राज्य करायचे असेल तर तुम्हाला समुद्राच्या आत जावे लागेल.” त्यानंतर दोघेही समुद्राच्या आत दिसतात.
दरम्यान, 10 सप्टेंबर रोजी पहिला ट्रेलर रिलीज झाला होता. पहिल्या ट्रेलरप्रमाणेच हा दुसरा ट्रेलरही चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करणारा आहे.. एनटीआर आणि सैफला समोरासमोर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सैफचा हा पहिला साऊथ चित्रपट आहे. त्याच्यासोबत जान्हवीही या चित्रपटातून साऊथ डेब्यू करत आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.