ओमान -भारताच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत या गटाच्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेचे विक्रमी चौथे विजेतेपद पटकावले.
तब्बल आठ वर्षांनंतर या दोन संघात अंतिम सामना रंगला होता व तो पाहण्यासाठी प्रचंड संख्येने चाहत्यांनी उपस्थिती राखली होती. या लढतीत सुरुवातीच्या अपयशानंतर पाकिस्तानने जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताचा गोलकिपर एच. एस. मोहितने त्यांचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले.
या सामन्यात पहिल्या सत्रातील 12 व्या मिनिटाला अंगद बीर सिंगने गोल करत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच अराजीत सिंग हुंडल याने 19 व्या मिनिटात गोल केला व ही आघाडी 2-0 अशी वाढवली. पाकिस्तानकडून एकमेव गोल अब्दुल बशरतने 37 व्या मिनिटाला नोंदला गेला.
मात्र, त्यानंतर पाकिस्तानला सामना संपण्यापूर्वी 50 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचा लाभ घेता आला नाही व हा सामना भारताने 2-1 असा जिंकत विजेतेपदाच्या करंडकावर नाव कोरले.
भारताने यापूर्वी 2004, 2005 व 2015 साली ही स्पर्धा जिंकली होती. तर पाकिस्तानने 1987, 1992 व 1996 साली स्पर्धेचे विजेतेपेद पटकावले होते.
भारताने यापूर्वी 2015 साली मलेशियात खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत पाकिस्तानला 6-2 असे पराभूत करत धूळ चारली होती. त्यानंतर आठ वर्षांनी ही स्पर्धा यंदा घेण्यात आली. मध्यंतरी करोनाच्या संकटामुळेही स्पर्धा अनेकदा लांबणीवर टाकली गेली होती.