नगर (प्रतिनिधी) -सावेडी उपनगराचे प्रवेशद्वार असलेल्या दिल्लीगेट भागात दरवर्षी पावसाळ्यास मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी पाठपुरावा करुन या भागातील रस्ताच कॉंक्रीटचा करुन घेतला. मात्र, या रस्त्याच्या बाजुने असलेल्या गटारींचे काम करण्यास प्रशसनासाला अजून वेळ मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाला आता येत्या एक जूनपर्यंतची मुदत देण्यात येत आहे. तत्पूर्वीच प्रशासानाने गतीने हे काम मार्गी लावावे, अशी तंबी आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
दिल्लीगेट परिसरातील रस्ते व गटारीच्या कामाची आमदार जगताप यांनी काल पाहणी केली. उपमहापौर मालन ढोणे, माजी नगरसेवक ऍड. धनंजय जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या शहर-जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, ऍड. शारदा लगड, शहर अभियंता सुरेश इथापे, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, संजय ढोणे आदी यावेळी उपस्थित होते. जगताप यांनी उपस्थित अधिकाऱ्यांनाकडे नाराजी व्यक्त केली.
दिल्लीगेट परिसर ते पत्रकार चौक दरम्यानचा रस्ता सावेडी उपनगराला जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असुनही रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरु आहे. त्यामुळे नागरीकांना सहन करावा लागत आहे. त्यातही रस्त्याचे काम पूर्ण होण्याअगोदर पाईप गटारीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आधी रस्त्याचे काम झाले. आता पाईप गटारीचे काम होईल. त्यातून पुन्हा नुकसान झाल्यास आता अधिकाऱ्यांनाच दोषी धरणार असल्याचेही ते म्हणाले.ऍड. जाधव यांनीही यावेळी अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना केल्या. महापालिका व बांधकाम विभागाकडे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे ते म्हणाले.