करोनाबाधितांवर उपचारांची तयारी पूर्ण : जुन्या कंपनीलाच कंत्राट
पुणे – करोनाबाधितांचा रोजच्या रोज होणारा उद्रेक लक्षात घेता महापालिकेने शिवाजीनगर येथील सीओईपी ग्राउंडवरील जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. हे हॉस्पिटल मंगळवारपासून सुरू होणार असून, रुग्ण दाखल करून घेण्याला सुरुवात केली जाणार आहे. सोमवारी रात्रीच हे हॉस्पिटल सज्ज होणार आहे.
या ठिकाणी अडीचशे बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यातील 125 बेड ऑक्सिजनचे, तर 25 बेड अतिदक्षता विभागात असतील. याशिवाय 100 बेड आयसोलेशनचे असतील. या ठिकाणी स्वच्छता करण्यत आली असून, ऑक्सिजनचाही पूर्ण पुरवठा करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्वतः ही कामे पूर्ण करून घेतली आहेत. याशिवाय दळवी रुग्णालयातही 30 ऑक्सिजन बेड वाढवले असून, शनिवारी पाच बेड आणि रविवारी 25 बेड अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
आधीही ज्या “मेडब्रो’ कंपनीने मनुष्यबळाचे मॅनेजमेंट केले होते, तीच कंपनी आताही याचे व्यवस्थापन पाहणार आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत याची सज्जता होईल आणि मंगळवारपासून रुग्ण दाखल करून घेण्याला सुरुवात होईल.
– डॉ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्य प्रमुख, मनपा