समिती स्थापन; महापालिका अतिरिक्त आयुक्तांची माहिती
पुणे – करोना बाधितांवरील उपचारासाठी सुरू करण्यात आलेले पुण्यातील सीओईपी ग्राउंडवरील आणि भोसरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जम्बो हॉस्पिटलमधील साहित्याचे वाटप करण्यासाठी चार जणांची सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये दोन्ही पालिकांचे आयुक्त, आरोग्य प्रमुख, जिल्हा आरोग्यप्रमुखांचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याविषयी माहिती दिली.
जम्बो हॉस्पिटल्स बंद करण्यात आल्याने पुढील महिन्यांत या दोन्ही हॉस्पिटलमधील उपचार साहित्यांचे दोन्ही महापालिका आणि ग्रामीण रुग्णालयांना वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठीच ही समिती स्थापण्यात आली आहे. या दोन्ही जंम्बो हॉस्पिटलमध्ये व्हेंटीलेटर्स, डायलिसीस मशिन्स, बेडस्, पंखे आदी साहित्य मोठ्याप्रमाणावर आहे.
राज्य सरकारशिवाय या दोन्ही हॉस्पिटलसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक सहाय्य केले असून, सरकारच्या वतीने पीएमआरडीएने समन्वयाची प्रमुख भूमिका पार पाडली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांसाठी ही दोन्ही हॉस्पिटल उभारली होती. या पार्श्वभूमीवर या दोन्ही रुग्णालयांसाठी मोठ्याप्रमाणावर खरेदी करण्यात आलेले उपचारसाहित्य पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामीण रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहे.