15 दिवसांत पूर्ण करणार; 800 बेड होणार उपलब्ध
पुणे – शहरातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (सीओईपी) मैदानावर जम्बो हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी 800 बेड उपलब्ध होणार असून हे काम अवघ्या 15 दिवसांत (दि.29) पूर्ण करण्यात येणार आहे. जम्बो हॉस्पिटलमुळे बाधितांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. दरम्यान, हे काम पूर्ण होईपर्यंत येत्या काही दिवसांत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयांमधील बेडची संख्या सुमारे 1,200 ने वाढविण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले.
करोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये राव यांनी ही माहिती दिली. यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते.
आयक्त राव यांनी सांगितले की, पुणे शहरातील पहिले जम्बो हॉस्पिटल सीओईपीच्या मैदानावर उभे रहात आहे. दिल्ली येथे डीआरडीओ जम्बो हॉस्पिटल उभारलेल्या एजन्सीलाच पुण्यातील हे काम देण्यात आले आहे. 10 ते 12 दिवसांत हॉस्पिटलचे स्ट्रक्चर उभे राहील. पावसाचा जोर वाढला तरी कामावर त्याचा परिणाम होणार नाही. हॉस्पिटलसाठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणाऱ्या एजन्सीबरोबर चर्चा करून याठिकाणी कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या ठिकाणी 600 ऑक्सिजन बेड्स आणि 200 आसीयू बेड्स असणार आहेत. तर डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय आदींसह 280 कर्मचारी याठिकाणी कार्यरत राहणार आहे. याठिकाणी केटरिंग व्यवस्था असणार आहे.
शासनाच्या सूचनेनुसारच पी 1,पी 2…
पुणे शहरातील व्यापाऱ्यांनी पी 1 आणि पी 2 ही दुकाने उघडी ठेवण्याची अट रद्द करण्याची मागणी केली आहे. याविषयी विचारले असता महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, “राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये पी 1 आणि पी 2 ही अट ठेवली आहे. त्याच्या आधारेच हा नियम लागू करण्यात आला आहे.’
राव म्हणाले..
– खासगी रुग्णालयांना सुमारे 14 प्रकारचे अहवाल द्यावे लागत होते. यामध्ये आता बदल करून फक्त पाच अहवाल केले आहेत.
– मुंबईच्या धर्तीवर केंद्रीय पद्धतीने खासगी व शासकीय रुग्णालयांमधील बेडचे वाटप रुग्णांना केले जाणार आहे.
– जम्बो हॉस्पिटलसाठी एकूण सर्व 70 ते 80 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.
– शहरात रुग्ण दुप्पटचा कालावधी 22 दिवसांवर.