पुणे – पुणे शहरातील पुरुष अधिकार कार्यकर्त्यांनी सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन अंतर्गत एकत्र येऊन एआय एक्सपर्ट अतुल सुभाष यांना श्रध्दांजली वहात न्यायासाठी आवाहन केले. यासाठी सर्व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्र जमले होते. त्यांनी देशाचे सरन्यायाधीश आणि जिल्हा न्यायालयांच्या प्रमुख न्यायाधीश यांना २५० हून अधिक पत्रे आणि फुले पाठवली आहेत.
तसेच देशातील पुरुषांच्या तक्रारी ओळखून त्यावर त्वरीत कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी भारतीय न्यायव्यवस्थेला गेट वेल सुन अशा शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी न्यायव्यवस्थेकडे पुरुषांना केवळ गुन्हेगार किंवा एटीएमसारखे न पहाता, माणूस म्हणून वागवो अशी मागणी केली.
अतुल यांना श्रध्दांजली वाहनाता म्हटले की, अतुल यांची प्रगल्भता आणि विचार करण्याची खोली वेगळी होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण असलेल्या न्याय व्यवस्था आणि पोलीस यंत्रणेच्या दुरुपयोगाचा विषय महत्वाचा आहे. असंख्य पुरुष अशा प्रकारच्या संकटांना सामोरे जात आहेत. मात्र सध्याच्या दुहेरी न्याय व्यवस्थेमुळे पुरुषांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते.
संघटनेचे सह संस्थापक पांडुरंग कुट्टी म्हणाले आम्हाला अशी न्यायव्यवस्था हवी आहे, जी पुरुषांना कोणत्याही ओझ्याशिवाय नात्यातून पुढे जाण्याची संधी देईल. तर समन्वयक समीर गोयल म्हणतात की, पुराव्या शिवाय गुजारा भत्ता आणि पोटगी आदेश दिले जात आहेत. जेव्हा पत्नीच्या तक्रारी खोट्या ठरतात, तेव्हा त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.
एक विवाह , एक न्यायालय…
समन्वयक सागर गुंठाळ यांनी आवाहन केले आहे की, सरकारने एक विवाह एक न्यायालय पध्दत लागू करावी जी अलिकडील एक राष्ट्र एक निवडणूक उपक्रमापासून प्रेरित आहेत. सध्या पुरुषांना विवाह अपयशी ठरल्यावर वेगवेगळ्या न्यायालयांत जावे लागते. ज्यामुळे मानसिक, आर्थिक आणि शारिरिक छळ सहन करावा लागतो.